पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभेच्या मैदानात; सोमवारी ‘महाविजय संकल्प सभा’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 12:26 PM2024-04-28T12:26:32+5:302024-04-28T12:27:26+5:30
मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार, श्रीरंग बारणे, आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येणार
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन २९ एप्रिल रोजी वानवडी येथील रेस कोर्स मैदान येथे सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. या सभेला २ लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसनेचे शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख संजय भोसले, मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, राजेंद्र शिळीमकर आदी उपस्थित होते. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. २१ विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार आहेत. या सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून गुगल लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचे पार्किंग कोठे आहे ते त्यांना समजेल. कार्यकर्त्यांनी येताना पाण्याची बाटली आणू नये. पाण्याची सोय मैदानात करण्यात आली आहे. २२ ठिकाणी एलईडी लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी येण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांनी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत सभेच्या ठिकाणी पोहोचावे असे पांडे यांनी सांगितले.
भाजपचे ३२ नगरसेवक गैरहजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या तयारीसाठी भाजपने माजी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ६८ माजी नगरसेवक हजर होते. ३२ नगरसेवक गैरहजर होते. या गैरहजेरीची चर्चा भाजप वर्तुळात जोरदार होती.