"पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधान बदलायचे आहे..." शरद पवारांची पंतप्रधानांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 01:02 PM2024-04-29T13:02:02+5:302024-04-29T13:03:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ‘चारसो के पार’ हा नारा देत आहेत. त्यांना एवढ्या मोठा प्रमाणात खासदारांची संख्या हवी आहे...
सासवड (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने हा देश चालवत आहेत, ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. देशातील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीने देशाचा कारभार चालवणं, हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, सध्याचे चित्र वेगळे आहे.
स्थानिक पातळीवर लोकशाही दिसत नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर राज्यकर्त्यांना पुढे जाऊन विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका देखील न घेण्याची दुर्बुद्धी सुचू शकते आणि ते चित्र सध्या देशामध्ये दिसत असल्याची टीका शरद पवार यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ‘चारसो के पार’ हा नारा देत आहेत. त्यांना एवढ्या मोठा प्रमाणात खासदारांची संख्या हवी आहे. कारण, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान बदलायचे आहे. याबाबतच्या टीका झाल्यानंतर ते संविधान बदलणार नाही, असं सांगतात. मात्र, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील भाजपचे खासदार आम्हाला देशाची घटना बदलायची आहे. त्यासाठी ४०० खासदारांचा आकडा हवा आहे, अशी वक्तव्ये करत आहेत. यातून लोकशाही किती धोक्यात आहे, याची प्रचिती या भाषणातून येत असून त्यामुळे या निवडणुकांमध्ये काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जात आहेत. ते महाराष्ट्रात आल्यानंतर ते आमची आठवण काढतात, आमच्यावर टीका-टिप्पणी करतात. उद्या पुण्यामध्ये त्यांची सभा आहे. तुम्ही त्यांचं भाषण ऐका पुण्यात आल्यानंतर ते भाषणाची सुरुवात पुणेकरांना माझा नमस्कार, असं म्हणून करतील. त्यानंतर ते मराठीमध्ये एक-दोन वाक्य म्हणतील आणि त्यानंतर त्यांना शरद पवारांची आठवण येईल, अशी खोचक टीका शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली. सासवडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोरदार समाचार घेतला.
उद्धवसेना नेते खा. संजय राऊत, पुरंदरचे आमदार संजय जगताप, शिरूरचे आमदार अशोक पवार, उद्धवसेना नेते आमदार सचिन आहीर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, अंकुश काकडे, शंकरनाना हरपळे, संभाजीराव झेंडे, प्रदीप पोमण, माणिकराव झेंडे, विजय कोलते, सुदामराव इंगळे, दिलीप बारभाई, अभिजित जगताप, दत्तात्रय कड, सुनीता कोलते, गौरी कुंजीर, पुष्कराज जाधव, बाळासाहेब भिंताडे, राहुल गिरमे, बंडूकाका जगताप यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.