Narendra Modi Pune Visit: पंतप्रधान मोदींचे स्वागत होणार राजबिंडया पुणेरी फेट्याने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:23 PM2022-03-04T20:23:20+5:302022-03-04T21:13:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुण्यात येणार आहेत
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुण्यात येणार आहेत. सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत. तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, ओव्हर हेड केबल काढण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आली आहेत.
''पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला सोबत घेऊन देशाचा गाढा चालवत आहेत. त्यांना आपला देश महासत्ता बनवण्यासाठी अजून ताकद मिळावी. या विचाराने पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आकर्षक राजबिंडा शाही फेटा तयार केला आहे. फेट्यावर असणारे हिरे म्हणजेच आपली जनता असणार आहे. या जनतेला घेऊन मोदी पुढे जाणार आहेत. या विचारातूनच आकर्षक राजबिंड्याची निर्मिती केली असल्याचे गिरीश मुरुडकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.''
''महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी एक ऐतिहासिक फेट्याची मागणी केली होती. त्यानुसार आम्ही एका आठवड्यापासून फेटा तयार करण्यास सुरुवात केली. मोदी पुण्यात आल्यावर पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळयाचे अनावरण करणार आहेत. त्यावरूनच आम्ही विचार करण्यास सुरुवात केली. नरेंद्र मोदी शक्यतो क्रीम कलरचे कपडे घालतात. तसेच लाल रंग हा ऐतिहासिक कलर आहे. या दोन्ही निरीक्षणावरून आम्ही फेटाही लाल आणि क्रीम या दोन रंगामध्ये तयार केला आहे. शिवरायांच्या या जन्मभूमीतून पुणेकरांच्या वतीने आम्ही राजबिंडा शाही फेटा मोदींना देऊन स्वागत करणार असल्याचे मुरुडकर यावेळी म्हणाले आहेत.''
फेट्यावरील राजमुद्रा हेच आकर्षण
राजबिंड्याच्या तुऱ्यावर सूर्यफूल बसवण्यात आले आहे. या सूर्यफुलावर नयनरम्य अशी राजमुद्रा बसवण्यात आली आहे. फेट्यावरील राजमुद्राच त्याचे आकर्षण ठरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत होणार राजबिंड्या पुणेरी फेट्याने (व्हिडिओ :- तन्मय ठोंबरे) #Pune@narendramodi@PMOIndiapic.twitter.com/xqRk1ArQf2
— Lokmat (@lokmat) March 4, 2022
फेट्याची वैशिष्ट्ये
- फेट्यासाठी कॉटन आणि सिल्क अशी दोन कपडे वापरण्यात आली आहेत
- क्रीम आणि लाल रंगामध्ये फेटा तयार करण्यात आला आहे
- फेट्याला ऑस्ट्रेलियन डायमंड वापरण्यात आले आहेत
- फेट्याच्या पृष्ठभागावर जाळी बसवण्यात आली आहे. मोदींनी फेटा घातल्यावर त्यांना गरम होणार नाही हा त्यामागचा उद्देश आहे.