Narendra Modi in Pune| 'या' दिवशी कोथरूडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 10:09 AM2022-03-01T10:09:13+5:302022-03-01T10:14:32+5:30
शहरातील विविध प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार...
पुणे: पुण्याच्या कोथरूड परिसरात पंतप्रधाननरेंद्र मोदींची (pm narendra modi) जाहीर सभा होणार आहे. कोथरूडमधील एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात ही सभा होणार आहे. 6 मार्च रोजी नरेंद्र मोदीपुणे दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण, विविध विकास कामांचं आणि प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
6 मार्च रोजी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण होणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे आणि पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी या दोन मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर पंतप्रधान आवास योजनेतील घरांची लॉटरी काढणे नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन यासोबत इतर काही विकास कामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.
6 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी लोहगाव विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी दाखल होतील. हा कार्यक्रम झाल्यानंतर गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशन वरून आनंद नगर मेट्रो स्टेशनवर जाणार आहेत. मेट्रोच्या उद्घाटनानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे.