पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर अखेर हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:02+5:302021-08-19T04:15:02+5:30
औंध : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औंध येथे उभारण्यात आलेले मंदिर अखेर हटविण्यात आले आहे. मंदिर उभारल्याने थेट पंतप्रधान ...
औंध : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औंध येथे उभारण्यात आलेले मंदिर अखेर हटविण्यात आले आहे. मंदिर उभारल्याने थेट पंतप्रधान कार्यालयाकडूनच कानपिचक्या मिळाल्या होत्या. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मंदिर कागदाने झाकून पंतप्रधानांचा पुतळा येथील भाजपा नगरसेवकाच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे.
भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी वरिष्ठांच्या सूचनांनंतर हा पुतळा हलविला आहे. औंध गाव येथे नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या कार्यालयाजवळ १५ ऑगस्ट रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला होता. देशातील नरेंद्र मोदी यांचे हे पहिलेच मंदिर असल्याचे सांगण्यात येत होते. खास जयपूर येथून मोदींचा मार्बल पुतळा तयार करुन घेण्यात आला होता. यासाठी १ लाख ६० हजार रुपये खर्च आला होता. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता येथील फलकावर लावण्यात आली होती. मात्र, हे मंदिर उभारल्यापासून टीकाही झाली होती. त्यामुळेच थेट पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सूचना केल्याची चर्चा होती. त्यामुळे मंदिर बांधणारे भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे हा पुतळा काढला.
भाजपातील वरिष्ठ नेतृत्वाने मुंडे यांना पंतप्रधान मोदी यांचा पुतळा काढण्यास संदर्भामध्ये सूचना केल्या होत्या. त्यानुसार हा भाऊ चर्चेत असलेला मंदिरातील देव म्हणून स्थापित झालेला मोदीजींचा पुतळा मुंडे यांनीच काढला. पंतप्रधान मोदींचा पुतळा हटवल्यानंतर या ठिकाणी उभारण्यात आलेले मंदिर पडदा टाकून बंद करण्यात आले आहे. याबाबत भाजपाचे कार्यकर्ते मयूर मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले, माझा देव मला भेटला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपा नगरसेवकाच्या कार्यालयात हा पुतळा ठेवण्यात आला आहे.