प्राचार्य, प्राध्यापक महाविद्यालय सुरू करण्यास अनुकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:11+5:302020-12-17T04:38:11+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्याबाबत प्राचार्य व प्राध्यापक संघटनेने अनुकुलता दाखविली आहे. विद्यापीठासह महाविद्यालय प्रशासनाने ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्याबाबत प्राचार्य व प्राध्यापक संघटनेने अनुकुलता दाखविली आहे. विद्यापीठासह महाविद्यालय प्रशासनाने सुद्धा त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात सर्व महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पुन्हा गजबजून जाणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने डिसेंबर महिन्यात सर्व संलग्न महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भितीमुळे महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय रद्द केला. मात्र, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी जानेवारी महिन्यात महाविद्यालये खुली होणार असल्याचे संकेत दिले असून त्यासाठी जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थी सुध्दा प्रत्यक्ष वर्गात येऊन शिक्षण घेण्यास उत्सूक आहेत. तर डिसेंबरमध्ये महाविद्यालये उघडण्यास विरोधात असणाऱ्या प्राचार्य व प्राध्यापकांनी जानेवारीत प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहेत.
महाविद्यालये सुरु करताना सुरुवातीला पदव्युत्तर पदवी, अंतिम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बोलवून प्रत्यक्ष वर्ग सुरू केले तर अडचण येणार नाही, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले.
------
काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहयला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य विषयक नियम पाळून महाविद्यालेय सुरू करण्यास हरकत नाही. शासन व विद्यापीठ प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या आदेशाचे पालन करून जानेवारी महिन्यात माहविद्यालये सुरू केली जातील.
- डॉ. सुधाकर जाधवर, सचिव, प्राचार्य महासंघ
---
येत्या १ डिसेंबरपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. तसेच कोरोना रूग्णांची संख्याही घटली आहे. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही. परंतु, शासन आदेशाचे पालन करून आरोग्याची काळजी घेत सर्वांना महाविद्यालयात काम करावे लागेल.
- डॉ. एस. एम. राठोड, अध्यक्ष, पुटा
---
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत येण्यासाठी एस.टी. बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल. तसेच जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असलेली महाविद्यालयांची वसतीगृहे खुली करावी लागतील.
- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा, महाविद्यालय, शिरूर