डॉ. रामचंद्र देखणे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले सन्मान जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 07:03 PM2019-07-01T19:03:59+5:302019-07-01T19:06:09+5:30
तीन दशकाहून अधिक काळ निष्ठेने डॉ. रामचंर्द्र देखणे यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला.
पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी संतसाहित्याचे आणि लोकसाहित्याचे अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते डॉ. रामचंर्द्र देखणे यांना जाहीर झाला आहे.
दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी फौंडेशन सभागृह येथे होणाऱ्या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे आठवे वर्ष असून, यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, न्या. नरेंद्र चपळगावकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. संस्थेतर्फे प्रतिवर्षी श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान केला जातो. श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेले इस्लामपूरच्या राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांचा यावर्षी विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
तीन दशकाहून अधिक काळ निष्ठेने डॉ. रामचंर्द्र देखणे यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना डॉ. रामचंद्र देखणे यांच्या विषयी विशेष आपुलकी होती. हा स्नेहानुबंध आणि डॉ. रामचंद्र देखणे यांनी विचारजागर करण्यासाठी दिलेंल्या महत्वपूर्ण योगदानाला अभिवादन करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे समितीने ठरविले आहे.
इस्लामपूरच्या राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक दजेर्दार कार्यक्रमांचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून प्रा. शामराव पाटील सातत्याने करीत आहेत. त्यांच्यामुळे अनेक दिग्गज साहित्यिक, कलावंत आणि वक्ते यांचा लाभ इस्लामपूरकरांना झाला. इस्लामपूरची श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यात प्रा. शामराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. म्हणूनच त्यांचा विशेष सन्मान करताना समितीला समाधान वाटत आहे, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.