विद्यार्थ्याला अश्लिल चित्रफित दाखविणाऱ्या प्राचार्याला धर्मगुरूंनी सुनावली होती पाच वर्षे नजरकैद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 08:22 PM2018-09-20T20:22:07+5:302018-09-20T20:37:00+5:30
विद्यार्थ्याला अश्लिल चित्रफीत दाखवल्या प्रकरणी वानवडीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्राचार्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : विद्यार्थ्याला अश्लील चित्रफीत दाखवल्या प्रकरणी वानवडीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्राचार्याला वानवडी पोलिसांनीअटक केली आहे. तपासादरम्यान प्राचार्यांने आणखी काही मुलांना अशी चित्रफीत दाखवली असल्याची बाब समोर आली आहे. परेराला त्यांचे पोलंड येथील धर्मगुरू यांनी पाच वर्ष नजर कैदेची शिक्षा सुनावली होती. एका प्रकरणात सोलापूर येथील हायस्कूलचे बिशप यांच्यामार्फत चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्याला नजरकैदेत ठेवण्याची शिक्षा त्यांचे पोलंड येथील धर्मगुरू यांनी सुनावली होती. त्यानुसार त्याला वाघोली येथे ठेवले होते, असा धक्कादायक प्रकाण उघडकीस आला आहे.
याप्रकरणी विन्सेंट व्हिजीटेवास संतानी परेरा (वय ५१, रा. वानवडी, मुळ रा. सांताक्रझ, मुंबई) असे कोठडी देण्यात आलेल्या प्राचार्याचे नाव आहे. तर शाळेतील महिला समुपदेशक जॅकलिन वॉस हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका पालकाने वानवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. परेरा याने पीडित विद्यार्थ्याला केबीनमध्ये बोलावून त्या आपल्या मोबाइलमध्ये अश्लील चित्रफित दाखवत असे आणि त्याच्याशी अश्लील चाळेही करीत. मार्च महिन्यात हा प्रकार त्याने केला होता. पीडित मुलाने हा प्रकार शाळेच्या महिला समुपदेशकाला सांगितले होते. तीने कुठलीही कृती न करता उलट या विद्यार्थ्यालाच गप्प बसायला सांगितले. या प्रकाराबद्दल शाळेकडून कुठलीही कारवाई होत नाही, असे त्या विद्यार्थ्याच्या लक्षात येताच त्याने याबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. मात्र अनेकांकडून आलेला दबाव आणि मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असल्याने पालकांनी आत्तापर्यंत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नव्हती. काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी पालकांना धीर दिला आणि तक्रार करण्यासाठी हिंमत दिली. त्यानंतर त्या पालकांनी प्राचार्य परेरा आणि महिला समुपदेशकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान फरेरा याला अटक करण्यात आली असून त्यांने आणखी काही विद्यार्थ्यांबरोबर हा प्रकार केला असून पोलीस त्याची माहिती घेत आहे.परेरा याला आणखी कोणी मदत केली आहे का?, फरार महिला समुपदेशकाचा शोध घेण्यासाठी आणि या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी फरेराला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अॅड. मकरंद औरंगाबादकर यांनी केली होती. ती मागणी मान्य करीत न्यायालयाने त्याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. बी. म्हस्के करीत आहेत.