निसर्ग मसाज सेंटरवर छापा
By Admin | Published: November 26, 2014 12:18 AM2014-11-26T00:18:25+5:302014-11-26T00:18:25+5:30
तीन तरुणींसह पाचजणांना अटक-सेंटरच्या महिला व्यवस्थापका रेखा मनोज बोईन (वय ३२, मूळ गाव वारजे, पुणे),
कोल्हापूर : मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या मिरजकर तिकटी परिसरातील निसर्ग मसाज सेंटरवर जुना राजवाडा पोलिसांनी आज, मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास छापा टाकला. या सेंटरच्या महिला व्यवस्थापकासह दोघांना अटक केली. व्यवस्थापक रेखा मनोज बोईन (वय ३२, रा. सरस्वती कॉलनी, उचगाव, ता. करवीर, मूळ गाव वारजे, पुणे), एजंट शिवाजी आनंदा गुरव (३८, रा. मानोळेवाडी, ता. भुदरगड) अशी त्यांची नावे आहेत. पीडित तीन तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. मसाज सेंटरचा मालक दीपक बाबूराव सपाटे (रा. लक्षतीर्थ वसाहत) हा पसार झाला.
मिरजकर तिकटी परिसरातील बालगोपाल तालीमसमोरील गुरुमहाराज वाड्याजवळील इमारतीमधील निसर्ग मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी महिला पोलीस अधिकारी स्मिता काळभोर यांना कारवाईचे आदेश दिले. काळभोर यांनी पथकासह या सेंटरमध्ये छापा टाकला असता कुंटणखाना सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी रेखा बोईन व एजंट शिवाजी गुरव यांच्यासह तीन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची कबुली दिली.
पोलीस अधिकारी काळभोर यांनी स्वत: फिर्याद देऊन अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी या शिवाजी पेठ, राजारामपुरी व जालना जिल्ह्यांतील आहेत. मसाज सेंटरचा मालक मात्र कारवाईची चाहूल लागताच पसार झाला. रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्याचे पोलिसांचे प्रयत्न होते. (प्रतिनिधी)
मसाज कमी, वेश्या व्यवसायच जास्त
कॅन्डल लाईटमध्ये मसाज, स्पेशल रुम्स, एकदा जरुर आनंद घ्या, अशा वृत्तपत्रांत जाहिराती देऊन ही मसाज केंंद्रे शहराच्या सर्वच भागात राजरोसपणे सुरू आहेत. त्याचे दरही भरमसाठ आहेत. त्यातील कांही मोजकी केंद्रेच मसाज करतात. इतर ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असतो; परंतु त्यावर कुणीच कारवाई करत नसल्याचे चित्र होते. राजवाडा पोलिसांनी ही पहिलीच कारवाई केली.