छापील साहित्य कुजतेय!
By admin | Published: February 9, 2015 04:04 AM2015-02-09T04:04:00+5:302015-02-09T04:04:00+5:30
जकात आकारणी सुरु असताना विविध कामांसाठी लागणारी पावती पुस्तके, रजिस्टर, प्रतिज्ञापत्र, खतावली आदी स्टेशनरीची छपाई केली होती.
सुवर्णा नवले, पिंपरी
जकात आकारणी सुरु असताना विविध कामांसाठी लागणारी पावती पुस्तके, रजिस्टर, प्रतिज्ञापत्र, खतावली आदी स्टेशनरीची छपाई केली होती. मात्र, एलबीटी लागू झाल्यामुळे या पावती पुस्तकांचा सर्व साठा फु गेवाडी येथील जकातनाका येथील गोदामात धूळखात आहे. लाखों रूपयांचे हे साहित्य कुजण्याच्या मार्गावर आहे.
महापालिकेच्या अनेक विभागांना विविध स्टेशनरीची वारंवार गरज पडत असते. मात्र, पालिकेला लागणारे स्टेशनरी साहित्य वेळेनुसार उपलब्ध होत नाही. मात्र जकातीचे साहित्य अथवा विविध ठिकाणी वापरात नसलेले विविध रद्दी अथवा भंगार स्वरुपातील साहित्य पडून आहे. यामुळे महापालिकेचे हे साहित्य चोरीला जाण्याचे अथवा परस्पर विक्रीचे प्रकार घडून येत आहेत. या सर्व वस्तुंच्या निविदा मंजूर होणे बाकी आहे. पावती पुस्तकांचा साठा कुजल्यानंतर याचा काही उपयोग होणार नाही. यावर कोणतीही निविदा अद्याप पालिकेच्या वतीने काढलेली नाही. याकडे प्रशासनाची डोळेझाक होत आहे.
जकात बंद होऊन जवळपास एक वर्ष होत आलेले आहे. मात्र, या जकातीला लागणारी स्टेशनरी व प्रिटिंग साहित्यावर अद्यापही काही निर्णय घेतलेला नाही. कर्मचारी डस्टबिन वाटपासाठी गेले असल्यामुळे माहिती देण्याकरिता कोणी उपलब्ध नाही. याचा लेखाजोखा शोधावा लागेल. अथवा शिल्लक साठा मोजावा लागेल, असे एलबीटी विभागाच्या वतीने सांगितले. जकातीची उपलब्ध विविध पुस्तके याविषयी झालेला खर्च व आकडेवारी याबद्दल कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड स्थानिक संस्था कर विभागाकडे उपलब्ध नाही. फुगेवाडी जकात विभागात गोदामाच्या कामाकरिता एक क्लार्क व शिपायाची नेमणूक केली होती. मात्र, या शिल्लक साहित्याचे कोणत्याही प्रकारचे लेखी स्वरूपात आकडेवारी उपलब्ध नाही. जागा अडकून पडलेली आहे.
शहरातील एकूण २६ ठिकाणी जकात नाके कार्यरत होते. शासन निर्णयानुसार जकात बंद करून १ एप्रिल २०१३ पासून एलबीटी लागू करण्यात आली. फुगेवाडी येथील जकात नाका या ठिकाणी जकातीच्या प्रिंटींग साहित्याचे गोदामात आहे. जकातीचे सामान ठेवण्यासाठी या गोदामचा वापर केला जात आहे. यामध्ये काही छपाई साहित्य एलबीटीचे आहे.
जकातीच्या प्रिटिंग साहित्यामध्ये एस्कॉर्ट पावती पुस्तके (परगमन शुल्क), प्री पास पावती, रहदारी , डिपॉझिट पावती पुस्तक, चार बारा फ ॉर्म, खतावली बिल पुस्तके, प्रतिज्ञापत्र, संगणक पावत्या आदी विविध प्रकारचे साहित्य या ठिकाणी पडून आहे. या सर्व पावती पुस्तकांचे कामकाज मार्च २०१३ पासून पूर्णपणे बंद झालेले आहे. महापालिकेने जकातीच्या साहित्यावर लाखो रुपयांमध्ये खर्च केलेला आहे. एलबीटीचा निर्णय अंमलात येणार होता तर एवढी पुस्तके छपाईसाठी गेली कशी हा प्रश्न निर्माण झालेला आहे. जकातीसाठी लागणारे छपाई साहित्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होणार नाही. याचा इतर कामांसाठी पुनर्वापर करणे अशक्य बाब आहे. याकरिता महापालिकेला जकातीच्या छपाई साहित्याची पूर्णपणे रद्दी करावी लागणार आहे. लाखोंच्या मालाची किंमत काही हजार रुपयांवर येणार आहे.