जुनाट यंत्रांवर होतेय छपाई
By admin | Published: August 25, 2015 05:02 AM2015-08-25T05:02:55+5:302015-08-25T05:02:55+5:30
स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या महापालिकेतील विविध विभागांच्या कागदपत्रांची छपाई मात्र २० ते २५ वर्षे जुन्या छपाई यंत्रांवरच होत आहे. महापालिकेचे घोले रस्त्यावरील
- राजानंद मोरे, पुणे
स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या महापालिकेतील विविध विभागांच्या कागदपत्रांची छपाई मात्र २० ते २५ वर्षे जुन्या छपाई यंत्रांवरच होत आहे. महापालिकेचे घोले रस्त्यावरील मामाराव दाते मुद्रणालय जुनाट छपाई यंत्र व अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर दररोज लाखो कागदपत्रांच्या छपाईचा भार सोसत आहे. नगरसेवक-अधिकाऱ्यांच्या व्हिजिटिंग कार्डपासून महापालिकेतील सर्व विभागातील प्रशासकीय कागदपत्रे, तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) लाखो तिकिटे, पासची छपाई दररोज या मुद्रणालयात केली जाते. पालिका प्रशासनाकडून मात्र या मुद्रणालयाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
पालिकेतील सर्व विभागांमध्ये आवश्यक कागदपत्रांची छपाई मागील अनेक वर्षांपासून दाते मुद्रणालयातून केली जाते. नगरसेवक-अधिकाऱ्यांची व्हिजिटिंग कार्ड, कार्यक्रमपत्रिका, विविध विभागांसाठी लागणाऱ्या नोंद वह्या, विविध प्रकारचे अर्ज, माहितीपत्रके यांसह विविध कागदपत्रांची छपाई या मुद्रणालयात होते. ई-तिकिटिंग बंद झाल्यानंतर पीएमपीची तिकीट, पास, नोंदवह्या, इतर प्रशासकीय कागदपत्रांची छपाईही येथेच केली जाते. त्यासाठी सध्या मुद्रणालयात दोन वेब आॅफसेट प्रिंटिंग मशिन, तर चार कमी क्षमतेच्या स्वीफ्टेड मशिन आहेत. मात्र, दोन वेब मशिन या २० ते २५ वर्षांपूर्वीच्या आहेत. प्रत्यक्षात या मशिन ५ ते १० वर्षांपूर्वीच बदलणे आवश्यक होते. तरीही याच मशिनवर सध्या दररोज लाखो कागदपत्रांची छपाई केली जात आहे. एका वेब मशिनवर केवळ पीएमपीच्या तिकीट छपाईचे काम चालते. त्यामुळे छपाईचा भार इतर मशिन्सवर पडत आहे. त्यातच अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्नही मुद्रणालयाला भेडसावत आहे.
मुद्रणालयासाठी ११२ कर्मचाऱ्यांची गरज असताना सध्या केवळ ६८ कर्मचारीच राबत आहेत. बाइंडर, मशिन आॅपरेटर, स्टोअर किपर, हेल्पर ही पदे रिक्त असल्याने अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. त्यातच दिवसेंदिवस कामाचा बोजा वाढतच चालला आहे. तसेच छपाईचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करून काम उरकावे लागत आहे. याबाबत मुद्रणालयाकडून नवीन यंत्र व कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत पाठपुरावा करूनही पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
तिकीट छपाई ३ कोटींवर
पीएमपीसाठी लागणाऱ्या तिकिटांची मागणी सातत्याने वाढत चालली आहे. मागील महिनाभरात मुद्रणालयाने पीएमपीला विविध दरांची सुमारे
तीन कोटी तिकिटे छापून दिली आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी तिकीट छपाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तिकीट छपाईचा मोठा बोजा आहे. दररोज १४ ते १५ लाख तिकिटे छापली जात आहेत. पीएमपीकडून यापेक्षा अधिक मागणी झाल्यास यापुढे वेळेवर तिकीट छपाई करून देणे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
पीएमपीकडे २१ कोटींची थकबाकी
मुद्रणालयाकडून पीएमपीला दर वर्षी सुमारे ४ कोटी रुपये किमतीची तिकिटे व इतर कागदपत्रांची छपाई करून दिली जाते. मात्र, मागील काही वर्षांत पीएमपीने या छपाईचा मोबदलाच दिलेला नाही. त्यामुळे तिकीट छपाई व इतर कामाचे सुमारे २१ कोटी रुपये थकीत असल्याची माहिती मुद्रणालयाचे व्यवस्थापक जयंत पवार यांनी दिली.
मुद्रणालयाला अत्याधुनिक यंत्र मिळावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रिक्त जागा भरण्याबाबतही कळविण्यात आले आहे. मात्र, त्यामध्ये राज्य सरकारकडून परवानगी मिळत नाही. नवीन यंत्र तसेच रिक्त जागा भरल्यास छपाईचा वेग वाढेल.
- जयंत पवार,
व्यवस्थापक, मामाराव दाते मुद्रणालय