करिअरला प्राधान्य, उशिरा लग्न अन् तिशीतच होताहेत गर्भाशयात गाठी; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 01:18 PM2023-08-23T13:18:53+5:302023-08-23T13:19:19+5:30
तरुणपणाच्या उंबरठ्यावर फायब्राईडची समस्या...
पुणे : करिअरला प्राधान्य, उशीर होणारे लग्न आणि उशिराने होणारी गर्भधारणा, कामाचा वाढता व्याप आणि त्यामुळे वाढलेला तणाव यांसारख्या कारणांमुळे फायब्रॉइड्सच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. पूर्वी ३० ते ४० वयाेगटातील महिलांच्या गर्भाशयातील फायब्रॉइड्स म्हणजे गाठींच्या समस्या वाढलेल्या दिसायच्या. आता हे वय आणखी कमी हाेत २१-३० वयोगटात आले आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे, असे स्त्रीराेगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स या स्नायूंच्या गाठी आहेत; परंतु क्वचितच त्यापैकी काही कर्करोगाच्या असू शकतात. त्याचे निदान पूर्वी ३० ते ४० वयाेगटात व्हायचे, हल्ली ते २१-३० वयोगटात आले आहे. या फायब्राॅइड्स छाेट्या बियांच्या आकारापासून ते खरबुजाच्या आकारापर्यंत वाढू शकतात. त्या एकापेक्षा जास्त असू शकतात.
ही आहेत लक्षणे :
- सर्वच स्त्रियांना याची लक्षणे जाणवतील असे नाही; परंतु मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव, ओटीपोटीत वेदना, वारंवार लघवी होणे.
- मूत्राशयावर दाब येणे, गुदाशयात वेदना होणे, कंबर दुखणे, बद्धकोष्ठता, पोटात गोळा येणे, सात दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारी मासिक पाळी, रक्ताच्या गुठळ्या.
- जास्त रक्तस्रावामुळे लाल रक्तपेशी (ॲनिमिया) नष्ट झाल्यामुळे थकवा येऊ शकतो.
- नैराश्य, चिंता, तणाव आणि भीती.
फायब्रॉइड्सचे निदान न झालेल्या महिलांची संख्या अधिक आहे. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत आता फायब्रॉइड्सच्या रुग्णांमध्ये ५० टक्के वाढ झाली आहे. दर महिन्याला अशा ४ ते ६ रुग्णांना फायब्रॉइडचे निदान होते. पौगंडावस्थेतही फायब्रॉइड्सची लागण होत आहे.
- डॉ. पद्मा श्रीवास्तव, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ
फायब्रॉइड्सची संभाव्य कारणे आणि फायब्रॉइड्सची नेमकी कारणे अद्याप अस्पष्ट आहेत; परंतु त्या कोणत्याही वयात होऊ शकतात. हार्मोनल असंतुलन: एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन, मासिक पाळीचे नियमन करणारे हार्मोन्स फायब्रॉइडच्या वाढीमध्ये भूमिका बजावतात.
- डॉ. सुप्रिया पुराणिक, फर्टिलिटी अँड सिनीअर कन्सल्टंट