‘अकरावी’ला प्रथम येणा-यास प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 10:58 PM2017-08-18T22:58:18+5:302017-08-18T22:59:06+5:30
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच ‘प्रथम येणा-या प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार आॅनलाइन प्रवेश फेरी राबविली जाणार आहे. या फेरीमध्ये गुणवत्तेचाही विचार केला जाणार असून विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार थेट महाविद्यालय निवडता येणार आहे.
पुणे, दि. 18 - इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच ‘प्रथम येणा-या प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार आॅनलाइन प्रवेश फेरी राबविली जाणार आहे. या फेरीमध्ये गुणवत्तेचाही विचार केला जाणार असून विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार थेट महाविद्यालय निवडता येणार आहे. त्यासाठी गुणांच्या टक्केवारीनुसार तीन गट केले जाणार आहेत. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही फेरी असणार आहे.
केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेमध्ये सध्या पहिल्या विशेष फेरीतील प्रवेश सुरू आहेत. या फेरीमध्ये सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दि. १९ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर अद्याप कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच प्रवेश मिळूनही काही कारणांमुळे प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य’ ही फेरी घेतली जाणार आहे. या फेरीची प्रक्रिया दि. २१ आॅगस्टपासून सुरू होणार असून याबाबतचे सविस्तर वेळापत्रक, कार्यपध्दती व मार्गदर्शक सुचना दि. १९ आॅगस्ट रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या जाणार आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना सहायक शिक्षण संचालिक मिनाक्षी राऊत म्हणाल्या, अकरावी प्रवेशासाठी यावर्षी पहिल्यांदाच ‘प्रथम येणाºया प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार प्रवेश फेरी राबविली जाणार आहे. पहिल्या विशेष फेरीअखेरीस सुमारे अकराशे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतील, असे दिसते. रिक्त जागांची संख्या सुमारे १५ हजार एवढी आहे. केवळ मोजक्याच महाविद्यालयांमधील काही शाखांचे प्रवेश शंभर टक्के पुर्ण झाले आहेत. तसेच प्रवेश प्रक्रियाही वेळेत संपवायची आहे. तुलनेने प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने नियमित फेरी न घेता प्रथम येणा-यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य’ या फेरीमध्ये गुणवत्तेचाही विचार केला जाणार आहे. त्यासाठी ८० ते १०० टक्के, ६० ते १०० टक्के आणि ३५ ते १०० टक्के असे गुणांचे गट केले जातील. या गटानुसार अनुक्रमे विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार महाविद्यालय निवडण्याची संधी दिली जाईल. त्यासाठी स्वतंत्र लिंक दिली जाईल. विद्यार्थ्यांना शाखा बदलण्याची संधीही मिळेल. त्यासाठी प्रत्येक गटाला वेगळा कालावधी दिला जाईल. जे विद्यार्थी प्रथम क्लिक करतील त्यांचा संबंधित महाविद्यालयातील प्रवेश निश्चित होईल. त्यानुसार रिक्त जागांचा आकडाही कमी होईल. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जावून प्रवेश घेतल्याशिवाय प्रवेश अंतिम होणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.