पुणे जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यावर प्राधान्य देणार: डॉ. अभिनव देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 11:55 AM2020-09-22T11:55:13+5:302020-09-22T11:57:44+5:30
डॉ. अभिनव देशमुख यांनी नुकताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.
पुणे : वाढत्या नागरीकरणाबरोबरच पुणे जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी वाढत असून या संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे नवनियुक्त पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. सध्या संपूर्ण राज्यात कोविड १९ वर नियंत्रण आणून मृत्यूदर कमी करण्यावर भर दिला जात आहे. पुणे जिल्ह्यातही सध्या कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अभिनव देशमुख यांनी नुकताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते.
देशमुख म्हणाले, पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच गुन्हेगारी वाढत आहे. संघटित गुन्हेगारीला नियंत्रित करण्याला आपले पहिले प्राधान्य असेल. महिलावरील अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणे़ शिक्षांचे प्रमाण वाढविण्यावर आपला भर असेल. वाढत्या शहरीकरणाबरोबर वाहतूकीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. वाहतूकीचे नियंत्रण करुन नियोजन करणे हे मोठे आव्हान ग्रामीण पोलिसांसमोर आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला भेट देऊन तेथील स्थानिक प्रश्न समजावून घेतल्यावर त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल.
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखणे, विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
कोरोना बाधितांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या प्रकार सुरुवातीला सर्वत्र झाले होते. पण आता कोरोना विषयीची भिती कमी झाली आहे.त्यामुळे आता असे प्रकार कमी झाले असतील, असे वाटते. जर असे कोठे प्रकार होत असतील तर तेथे लोक प्रबोधन आणि कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.