Eknath Shinde: मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्राधान्य देणार; एकनाथ शिंदेंचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 05:11 PM2024-08-18T17:11:09+5:302024-08-18T17:14:19+5:30
मराठी माणसं जिथे गेली तिथे आपली संस्कृती, भाषा टिकविण्याचा प्रयत्न होतोय
पुणे: ‘‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. नुकतीच दिल्लीत नीती आयोगाची बैठक झाली. त्यामध्ये मी प्राधान्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही मागणी केली. त्याविषयीचा पाठपुरावासुद्धा सातत्याने करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. १७) पुण्यात दिले.
‘सरहद’ पुणे संस्थेच्या पुढाकाराने दिल्लीमध्ये ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्या संमेलनाचा कार्यारंभ पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, सरहदचे संस्थापक संजय नहार आदी यावेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘जगभरात मराठी माणसांना महाराष्ट्राचा अभिमान आहे. ते लोक व्हिडीओ कॉलवर माझ्याशी संवाद साधतात. प्रत्येक मराठी भाषेचा अभिमान असणाऱ्याला साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याचा अभिमान आहे. हा भाषेचा उत्सव यशस्वीपणे पार पडेल, यासाठी मी स्वत: प्रयत्न करेन. मराठी माणसं जिथे गेली तिथे आपली संस्कृती, भाषा टिकविण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याची सरहद ओलांडून माय मराठी राष्ट्रीय पातळीवर जात आहे. ही आनंदाची बाब आहे. दिल्लीसह उत्तर भारतात राहणाऱ्या बांधवांना हा सोहळा अनुभवता येणार आहे.’’
संमेलनाच्या यशस्वितेसाठी सरकार आयाेजकांच्या पाठीशी
‘‘संमेलन हा आपला अभिमान आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. संमेलन आयोजित करताना पैशांची अडचण असते. ही अडचण आम्हाला कोणीही सांगितली नाही, पण आम्ही समजून घेतली आणि म्हणून निधी २ कोटी रुपये केला. शासन संमेलन यशस्वी होईल म्हणून पाठीशी आहे, असे शिंदे म्हणाले.
देशाच्या राजधानीत हे संमेलन होत आहे. खरं तर पुणे ही मराठीची सांस्कृतिक राजधानी आहे. या सांस्कृतिक राजधानीमधून आपले संमेलन देशाच्या राजधानीमध्ये जात आहे. तिथे आपल्या मराठीचा डंका वाजेल. हे ऐतिहासिक संमेलन ठरेल. म्हणून मी मुख्यमंत्री या नात्याने साहित्य संमेलनाचा भाग बनून काम करेन. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री