महिला डब्यात घुसाल तर तुरूंगवास : रेल्वे प्रशासनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 06:36 PM2018-11-24T18:36:49+5:302018-11-24T18:53:54+5:30
कामानिमित्त लोकलमधून प्रवास करताना यापुढील काळात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक पावले उचलली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे : लोणावळा लोकलच्यामहिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये घुसखोरी करणाऱ्या पुरूष प्रवाशांना आता दंडात्मक कारवाईसह तुरूंगवासही होऊ शकतो. यापुढील काळात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक पावले उचलली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे ते लोणावळा मार्गावर दररोज सुमारे ४२ लोकल धावतात. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. विद्यार्थिनी, नोकरदार महिला,मजुरी करणाऱ्या महिला लोकलचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे या गाड्यांमध्ये महिलांसाठी एक डबा आरक्षित करण्यात आलेला आहे. त्यामधून पुरूषांना प्रवास करता येत नाही. महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या विशेष डब्ब्यांमधून अनेकदा पुरूष प्रवासीही प्रवास करत असल्याचे सातत्याने दिसून येते. त्यासाठी डब्ब्यांमध्ये महिला पोलिसही ठेवले जातात. पण त्यानंतरही त्यात फरक पडलेला नाही. पुरूषांची घुसखोरी सुरूच असल्याच्या तक्रारी महिलांकडून केल्या जात आहेत. महिलांच्या डब्यांमध्ये पुरूष प्रवासी आढळून आल्यास सध्या त्यांना पकडून खाली उतरविले जाते. पण आता पुढील काळात संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईबरोबरच तुरूंगवासाची शिक्षाही होऊ शकते, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
महिलांच्या सुविधेसाठी विशेष डब्ब्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी विशेष असा उल्लेख डब्यांवर करण्यात आलेला आहे. तसेच स्थानकांवर त्याबाबत उद्घोषणाही केल्या जातात. मात्र, त्यानंतरही पुरूष प्रवाशांची घुसखोरी सुरू आहे. त्यामुळे यापुढील काळात पुरूषांनी या डब्ब्यांमधून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.