सबजेलमधून खिडकीचे गज कापून कैदी पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:46 AM2018-10-23T00:46:43+5:302018-10-23T00:46:45+5:30
जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेतलेल्या आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली.
पुणे : जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेतलेल्या आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली. पोलीस कोठडीमध्ये असताना सोमवारी मध्यरात्री खिडकीचे गज कापून हे चोरटे पसार झाले. वास्तविक पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे या चोरट्यांना पळून जाण्याची संधी मिळाल्याची चर्चा असून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा. मंचर, ता. आंबेगाव) आणि राहुल देवराम गोयेकर (वय २६, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी कोठडीतून पळालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांदळे आणि गोयेकर हे दोघेही एका गुन्ह्यामध्ये येरवडा कारागृहामध्ये कोठडीत होते. या दोघांनी राजगुरुनगर पोलिसांच्या हद्दी त केलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची माहिती उघड झाली होती. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी खेड पोलिसांनी या दोघांना न्यायालयीन कोठडीमधून गुन्ह्यात शनिवारी वर्ग करुन घेतले होते. अटकेची कारवाई करीत त्यांची पोलीस कोठडी न्यायालयाकडून मिळवली होती. त्यानुसार हे कोठडीमध्ये होते. त्यांच्याकडे तपास सुरु होता.
रविवारी रात्री खेड तहसील कार्यालयाच्या आवारातील पोलीस कोठडीमध्ये या दोघांना ठेवण्यात आले होते. जवळच पोलीस उपअधिक्षकांचेही कार्यालय आहे. मध्यरात्री आरोपींनी कोठडीच्या पाठीमागील भिंतीला असलेल्या खिडकीचे गज कापले. या कोठडीमध्ये त्यावेळी सहाजण होते. आरोपींनी या खिडकीवाटे बाहेर उड्या टाकल्या. स्वच्छतागृहाच्या बाजुने आरोपी पसार झाले. दरम्यान, कोठडीतील काही गुन्हेगारांनी त्यांना मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक गजाजन टोम्पे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या कर्तव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.