कारागृहातील महिलांनी फुलवला हिरवा मळा
By admin | Published: March 8, 2016 01:15 AM2016-03-08T01:15:44+5:302016-03-08T01:15:44+5:30
जगण्याच्या धांदलघाईत नकळत हातून एक चूक गुन्हा झाला आणि थेट कारागृहात बंदी म्हणून त्या जगू लागल्या. पण बंदीवानाचे जिणे आले तरी कारागृहात खितपत पडून
पुणे : जगण्याच्या धांदलघाईत नकळत हातून एक चूक गुन्हा झाला आणि थेट कारागृहात बंदी म्हणून त्या जगू लागल्या. पण बंदीवानाचे जिणे आले तरी कारागृहात खितपत पडून राहण्यापेक्षा त्यांनी स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला आणि त्यातूनच या कैदी महिलांनी दुष्काळातही हिरवा मळा फुलवला. कारागृहाच्या भाजीपाल्याचा प्रश्न तर मिटलाच पण या महिलांच्या मेहनतीने कारागृह उत्पादनातही विक्रमी वाढ करून दाखविली. आयुष्यातील एका चुकीची शिक्षा भोगून परिमार्जन होत असतानाच येरवडा येथील खुल्या कारागृहातील महिला कैद्यांनी कारागृह अधिकाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनाने आयुष्याला एक चांगली दिशाही देऊ केली आहे.
महिला खुल्या कारागृहात एकूण २७८ कैदी आहेत. त्यात १७३ महिलांना शिक्षा झाली असून १०५ आरोपी न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. महिलांंची १३ लहान मुलेही कारागृहात आहेत. दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, झांबिया आणि बांगलादेश येथील काही महिला कैदीही कारागृहात आहेत. शेतीबरोबरच लहान-मोठ्या वस्तूंची निर्मिती कारागृहात केली जाते. खुल्या कारागृहाने एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ९ लाख ८६ हजाराहून अधिक उत्पादन काढले असून, मार्च महिन्यातील उत्पादनासह हा आकडा ११ लाखापर्यंत जाणार आहे. कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महानिरीक्षक डॉ. शहाजी सोळुंके , उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील महिला कैद्यांसाठी उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षा भोगत असलेल्या कैदी महिलाच इतर महिला कैद्यांना योगाचे प्रशिक्षण देत आहेत. अनेक महिन्यांपासून योगा करत असल्यामुळे काही महिला कैद्यांचा मधुमेहाचा व पाठीच्या कण्याचा त्रासही कमी झाला आहे. महिला खुले कारागृहच्या उपअधीक्षक अरुणा मुगुटराव आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी पल्लवी कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. कदम म्हणाल्या, कारागृहातील महिला कैदी दररोज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शेतीमध्ये काम करतात. बैलांच्या मदतीने केली जाणारी सर्व अवजड कामे याच महिला कैदी करतात. सध्या ४२ महिला कैदी शेतीत काम करत आहेत.