कैद्यांनी अनुभवले ‘नादब्रह्म’

By Admin | Published: February 18, 2017 03:53 AM2017-02-18T03:53:58+5:302017-02-18T03:53:58+5:30

जग अत्यंत सुंदर आहे. माणसाच्या अंतर्मनाला स्पर्श करून जाणारे संगीत त्यामध्ये आहे. कारागृहाच्या चार भिंतींच्या आत हे संगीत ऐकायला

Prisoners experienced 'Nadabrahm' | कैद्यांनी अनुभवले ‘नादब्रह्म’

कैद्यांनी अनुभवले ‘नादब्रह्म’

googlenewsNext

पुणे : जग अत्यंत सुंदर आहे. माणसाच्या अंतर्मनाला स्पर्श करून जाणारे संगीत त्यामध्ये आहे. कारागृहाच्या चार भिंतींच्या आत हे संगीत ऐकायला मिळते कुठे? त्यातही जर उस्ताद झाकीर हुसेनसारख्या ‘लिव्हिंग लिजंड’चे वादन अनुभवने दूरच. परंतु, कैद्यांच्या दृष्टीने कल्पनेच्या पलिकडचं हे संगीतलेणं त्यांना शुक्रवारी अनुभवता आलं. येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये रंगलेल्या या स्वराविष्कारामधून कैद्यांनी ‘नादब्रह्मा’चा आनंद घेतला. याची देही याची डोळा अनुभवलेले उस्तादजी पाहून अनेक कैद्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.
महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळाच्या वतीने कैद्यांसाठी मागील दीड वर्षांपासून ‘प्रेरणापथ’ नावाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबलावादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उस्तादजींनी कैद्यांशी संवाद साधला. यावेळी कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, उपमहानिरीक्षक स्वाती साठे, पुणे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण, कारागृह अधीक्षक यू. टी. पवार, डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी, अ‍ॅड. प्रताप परदेशी यावेळी उपस्थित होते.
उस्तादजींनी तबल्याच्या तालांची माहिती देतानाच वैशिष्ट्यपूर्ण वादनाने सर्वांना खिळवून ठेवले. त्यांची तबल्यावर पडणारी एक एक थाप उपस्थितांच्या मनावर छाप उमटवून जात होती. पोलीस अधिकारीच काय परंतु, खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अपहरण आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेल्या खतरनाक गुन्हेगारांच्या तोंडामधूनही ‘वाह’ची दाद बाहेर पडत होती. कारागृहाच्या चार भिंतींआड आपण जगातलं सर्वोत्तम असं काही गमावून बसलो आहोत, ही भावना अनेकांच्या मनात उचंबळून आली. उस्तादजींनी तर पाहुण्यांचे स्वागत, धावणारी रेल्वे, शंख व डमरू यांचा एकत्रित आवाज तबल्याच्या माध्यमातून काढून दाखवला. एकूणच भारावलेल्या या वातावरणामुळे हा परिसर नेमका कारागृहाचा आहे की एखाद्या संगीतनगरीचा, असा प्रश्न पडला होता.
उस्तादजी म्हणाले, ‘‘कारागृहात आलात म्हणजे तुमचे जीवन संपलेले नाही. एक चूक घडून गेली ती गेली. आता योग्य मार्गावरून मार्गक्रमण करा. आज कारागृहात तबला वाजवताना भेट झाली, मात्र पुढील वेळी आपली भेट मुंबई-पुण्यातील सभागृहांत कार्यक्रमांमध्ये व्हावी. कारागृहाच्या भिंतीबाहेर मी तुमची वाट पहातोय. तबला वादनास कैद्यांनी दिलेला प्रतिसाद हा सवाईगंधर्व किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रेक्षकांप्रमाणेच भरभरून आहे.’’ यावेळी एका कैद्याने महंमद रफी यांचे गाणे सादर केले.

 तबला वादक ज्यांना आपला आदर्श मानतात, अशा तबल्याच्या मानदंडासमोर वादन करण्याची संधी कोण सोडेल? कारागृहाच्या महिला अधिकारी तेजश्री पोवार यांना ही संधी मिळाली. उस्ताद झाकीर हुसेन यांनी पोवार यांना मंचावर बोलावले. पोवार यांनीही उस्तादजींना अभिवादन करून चार-पाच ताल वाजवले.

 त्यांच्या वादनाला उस्तादजींनी भरभरून दाद दिली. यावर पोवार म्हणाल्या, ‘लहानपणापासून आवड असल्यामुळे तबलावादन शिकले. कोल्हापूरला ज्यांच्या कार्यक्रमाची कार्यक्रमाची प्रयत्न करुनही तिकीटे मिळाली नाहीत, त्या उस्तादजींसमोर आज तबला वाजवण्याची संधी मिळाली. आयुष्यातील हा क्षण अनमोल आहे.’

Web Title: Prisoners experienced 'Nadabrahm'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.