खाजगी क्लासेसवाल्यांनी विद्यार्थ्यांना बनवले कैदी; मनुष्यबळ विकास मंत्र्यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:17 PM2017-10-16T16:17:48+5:302017-10-16T16:24:27+5:30
कोचिंग क्लासेसवाले विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेण्याऐवजी परीक्षार्थी बनवून कैदी बनवत असल्याची टीका प्रकाश जावडेकर यांनी ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी केली.
पुणे : सध्या कोचिंग क्लासेसचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले आहे. ८ वी पासूनच जेईई वगैरेचे क्लास विद्यार्थी लावू लागले आहेत. त्यातून क्लासेसवाले विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेण्याऐवजी परीक्षार्थी बनवून कैदी बनवत असल्याची जोरदार टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केली.
सीओईपी कॉलेजमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’ स्पर्धेचे उद्घाटन प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त सचिव सुब्रम्हण्यम, एआयसीटीचे चेअरमन अनिल सहस्त्रबुध्दे, सीओईपीचे संचालक बी. बी. आहुजा, अभय जेरे यावेळी उपस्थित होते. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन अॅपचे उद्घाटन करण्यात आले.
प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘देशातील तरूणाईने विचार करण्यास प्रवृत्त होऊन नवनवीन शोध लावावेत यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसमोर काही समस्या ठेवल्या जाणार आहेत. त्या समस्या त्यांनी तंत्रज्ञानाच्या व शोधाच्या माध्यमातून सोडवायच्या आहेत. यासाठी विद्यार्थी विविध प्रयोग करतील, त्या समस्येवर इतर देशांनी काय सोल्युशन काढले आहे याचा धांडोळा घेतील, त्याबाबत नवीन अपडेट काय घडले आहेत याची माहिती घेतील. आपपासात चर्चा करतील. त्यातून ते त्या समस्यांचे समाधान शोधून काढतील. त्यातून त्यांचे खरं शिक्षण घडणार आहे. ही शिक्षणाच्या दुहेरी पध्दतीतून त्यांना खूप काही शिकायला मिळणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रतिभेला संधी मिळवून देणे खूप आवश्यक बनले आहे. अलीकडच्या काळात कोचिंग क्लासवाल्यांनी इयत्ता ८ वी पासून विद्यार्थ्यांना कैदी बनवून टाकण्यास सुरूवात केली आहे.’’
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला फुलविण्याची संधी त्यांना प्राप्त होणार आहे. मागील हॅकेथॉन स्पर्धेचे अत्यंत चांगले निकाल मिळाले आहेत. विविध ५२ प्रकारच्या समस्यांचे विद्यार्थ्यांनी समाधान शोधले आहे. संबंधित मंत्रालय, तंत्रज्ञान विभाग यांच्याकडे ते सोपविण्यात आले असून त्यावर आणखी काम करण्यात येत आहे. तार्किक प्रक्रियेतूनच शोधाचा उगम होतो. ही आनंदाची प्रक्रिया आहे. यातूनच विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
अनिल सहस्त्रबुध्दे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांमुळे समस्या उभ्या राहिल्याचे आपल्याला अनेकदा बातम्यांमधून वाचायला मिळते, मात्र हॅकेथॉन स्पर्धेमुळे विद्यार्थी देशासमोरच्या समस्यांवर समाधान शोधून काढत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. यंदा हार्डवेअरच्या क्षेत्रातील संशोधनावर या स्पर्धेत भर देण्यात आला आहे.’’
अभय जेरे, सुब्रम्हण्यम यांनीही यावेळी विचार मांडले.