‘छत्रपती’साठी पृथ्वीराज जाचक यांचे सारथ्य; ‘साहेबां’ बरोबरच्या 'लंच डिप्लोमसी’मध्ये शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 06:11 PM2020-08-03T18:11:25+5:302020-08-03T18:43:14+5:30
गेल्या १७ वर्षांपासुन राष्ट्रवादी काँग्रेससोबत असणारे जाचक यांचे साहेबांबरोबरचे राजकीय वितुष्ट यानिमित्ताने संपुष्टात आले आहे.
बारामती: राज्यात एके काळी पहिल्या पाच साखर कारखान्यांमध्ये गणला जाणारा भवानीनगर (ता.इंदापुर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे.कारखान्यापुढे सहवीजनिर्मिती प्रकल्प,विस्तारवाढीचेच्या प्रकल्पांचे मोठे कर्ज आहे. कामगारांचे पगार लांबले आहेत.कारखाना अडचणीत गेल्याने ऊसउत्पादक सभासद संभ्रमात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी अध्यक्ष शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्याकडे या कारखान्याचे ‘सारथ्य’ देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यावर सोमवारी(दि ३) मुंबई येथे ‘सिल्व्हर ओक ’ या निवासस्थानी ‘साहेबां’ बरोबर ‘लंच डिप्लोमसी’मध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
गेल्या १७ वर्षांपासुन राष्ट्रवादी काँग्रेससोबत असणारी जाचक यांचे राजकीय वितुष्ट यानिमित्ताने संपुष्टात आले आहे. याला निमित्त ठरली माळेगांव कारखान्याची काही महिन्यांपुर्वी पार पडलेली निवडणुक. कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी ‘छत्रपती’ कारखान्याच्या स्थितीचे भांडवल केले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बाब गांभीर्याने घेत योग्य पाऊल उचलण्याची भूमिका भर प्रचार सभेत जाहीर केली.शिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वडील दिवंगत गोविंदराव पवार देखील या कारखान्याचे संचालक आहेत.दिवंगत आप्पासाहेब पवार यांनी कारखान्यात काम केले आहे. शिवाय पवार कुटंबिय कारखान्याचे सभासद देखील आहेत. त्यामुळे जाचक यांच्याप्रमाणे पवारांचे देखील या कारखान्यासमवेत भावनिक बंध आहेत. त्यानंतर जाचक आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु झाला.यामध्ये बारामती नगरपरीषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी महत्वाची भूमिका केली.
आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जाचक,त्यांचे चिंरंजीव कुणाल जाचक यांची गुजर यांनी भेट घडवुन आणली. ही भेट सहकार,राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे. पवार यांच्या समवेत ‘लंच डीप्लोमसी’मध्ये जाचक यांच्या छत्रपतीच्या ‘सारथ्या’वर शिक्कामोर्तब करण्यात आले. जाचक यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव,अभ्यासाची जाण या ‘सारथ्या’साठी महत्वाची ठरली आहे. १७ वर्षांपुर्वी जाचक कारखान्याच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसपासुन बाजुला झाले होते. जाचक यांचे वडील दिवंगत साहेबराव जाचक कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत.त्यामुळे जाचक यांचे कारखान्यासमवेत भावनिक नाते आहे.याच पार्श्वभूमीवर सुवर्ण महोत्सवी वर्षात कारखान्याचे अध्यक्षपद असावे अशी जाचक यांची इच्छा होती. मात्र, त्यावेळी अचानक दत्तात्रय भरणे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. मात्र, सुवर्णमहोत्सवी वर्षात जाचक यांच्या भावनेशी निगडीत इच्छा पुर्ण न झाल्याने जाचक बाजुला गेले होते.तेव्हापासुन शेतकरी कृती समितीच्या माध्यमातुन जाचक कारखान्याच्या कारभारावर बोट ठेवुन होते.
‘छत्रपती’ ला ‘यशवंत’ करा, यशवंत होवु देवु नका,अशी भावनिक साद देखील जाचक यांनी वेळोवेळी घातली. त्यासाठी जाचक यांच्या सभा,आंदोलन सुरुच होती. या दरम्यान, सहकारी साखर कारखानदारी अडचणीत गेली. त्यामध्ये कारखान्यावर असणारे कोट्यावधींचे कर्ज वाढतच आहे.या पार्श्वभुमीवर कारखाना पुर्वस्थितीत आणण्यासाठी १७ वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे.मात्र, सध्याची कारखान्याची अवस्था पाहता जाचक यांचे सारथ्य ‘काटेरी’ ठरणार आहे.
सध्या कोरोनामुळे छत्रपतीची निवडणुक प्रस्तावित असुन देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जाचक सध्या कारखान्याचे केवळ सारथ्य करणार आहेत. निवडणुकीनंतर अध्यक्षपद स्वीकारण्याचे संकेत आहेत.
याबाबत ‘लोकमत‘शी बोलताना पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले कि,कारखान्याच्या उभारणीमध्ये पवार आणि जाचक कुटुंबियांचे योगदान आहे.दोन्ही कुटुंबाचे कारखान्यासमवेत भावनिक नाते आहे.त्यामुळे सभासद आणि कारखान्याचे हित डोळ्यासमोर ठेवुन राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.त्याला ज्येष्ठ नेते शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.सहकार,साखर धंद्यातील अडचणींबाबत चांगली चर्चा झाली.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, कारखाना हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निर्णय पृथ्वीराज जाचक यांनी निर्णय घेतला आहे.या निर्णयाबाबत मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होवुन त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ‘मी’ देखील कारखान्याचा सभासद आहे. सभासदांच्याच प्रपंचासाठी जाचक यांना परत आणण्यासाठी १७ वर्ष माझा प्रयत्न होता,असे गुजर यांनी स्पष्ट केले.
————————————————————