बाेपदेव घाटात खासगी बस उलटली ; 2 जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 06:45 PM2018-06-03T18:45:30+5:302018-06-03T18:45:30+5:30
बाेपदेव घाटात एक खाजगी बस ब्रेकफेल झाल्याने पलटली. यात दाेन जण गंभीर जखमी झाले, तर 18 प्रवाशांना किरकाेळ दुखापती झाल्या.
गराडे : बोपदेव (ता. पुरंदर) घाटातील पहिल्या वळणावर ५२ प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी प्रवासी बस ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे पलटली. यावेळी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. बसमधील ५२ प्रवाशांपैकी २ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १८ प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या.
बसचा ड्रायव्हर संजय सिंग याच्याविरुद्ध गिरीश चौबे व सुमळ वर्मा यांनी फिर्याद दाखल केली. ठाणे अंमलदार एस. एम. महाजन यांनी फिर्याद नोंदवून घेतली. सासवड पोलीस ठाण्यात माहितीनुसार राष्ट्रीय ज्ञान प्रबोधिनी दृष्टि शिबिर ३० मे ते ८ जून या कालावधीत ज्ञानप्रबोधिनी विद्यालय सेक्टर- २४ निगडी पुणे येथे आयोजित केले आहे. या शिबिरासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्र या राज्यातील निवडक ५० प्रशिक्षणार्थी व २ लहान मुले अशा ५२ प्रवाशी यांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण प्रवासासाठी मध्य प्रदेश येथील लोहपुरुष ट्रॅव्हल्स एजन्सीची (एमपी ३, पी ०३४९) खासगी प्रवाशी बस ठरविण्यात आली होती. या बसवर संजय लोहार सिंग हा चालक होता. या संपूर्ण प्रवासाचे व्यवस्थापन व्यवस्थापक अभिषेक अज्ञानी यांच्याकडे होते. रविवार पहाटे ५.२० वा. ५२ प्रवाशी असलेली खासगी बस निगडी येथून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे देवदर्शनासाठी निघाली. पुणे येथील खडी मशिन चौकातून ही बस बोपदेव घाटाकडे निघाली. सकाळी साडेसहाला आस्करवाडी (ता. पुरंदर) हद्दीतील बोपदेव घाट पहिल्या वळणावर या बसचे ब्रेक निकामी झाल्याचे ड्रायव्हर संजय सिंग याच्या लक्षात आले. त्याने क्षणार्धात बस डाव्या बाजूच्या टेकडीच्या भरावावर घातली. बस उजव्या बाजूस पलटली. या अपघातात ५२ प्रवाशांपैकी २ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १८ प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. इतर प्रवाशी घाबरलेल्या अवस्थेतून बसमधून उतरले. ते सर्व सुरक्षित आहेत. राजेश चौबे व लता स्वरांजली हे दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले. ड्रायव्हर संजय सिंग याच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. सर्व जखमींना सासवड येथील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. किरकोळ दुखापती असणाºया प्रवाशांना उपचारानंतर सोडण्यात आले. तर २ खंबीर जखमींना पुण्यातील दवाखान्यात नेण्यात आले.
घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश यादव, महेश सूर्यवंशी, कैलास सरक, पोलीस पाटील मनोहर पायगुडे, सचिन दळवी, होमगार्ड एस. ए. शिवतारे यांनी पाहणी केली. आस्करवाडीचे सरपंच परशुराम पायगुडे संतोष बागमार, अजय कांगडे, पंकज जगताप, गणेश दळवी, नवनाथ दळवी, अतुल शिर्के यांनी जखमींना मदत केली. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पी. बी. चव्हाण हे करीत आहेत.