खासगी कोविड केअर सेंटरचे महापालिकेकडून होणार ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:11 AM2021-04-24T04:11:38+5:302021-04-24T04:11:38+5:30
पुणे : खासगी कोविड केअर सेंटर सुरू करताना घ्यावयाची दक्षता याची हमी देऊनही, त्याचे पालन काही खाजगी कोविड केअर ...
पुणे : खासगी कोविड केअर सेंटर सुरू करताना घ्यावयाची दक्षता याची हमी देऊनही, त्याचे पालन काही खाजगी कोविड केअर सेंटर (सीसीसी) कडून होत नसल्याचे आढळून आले आहे. पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी कोविड केअर सेंटरचे ऑडिट करण्याचे आदेश शहरातील पाचही परिमंडळच्या विभागीय वैद्यकीय अधिकारी यांना दिले आहेत़
याबाबत महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी सांगितले, की मुंबई येथील कोविड केअर सेंटरला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील खाजगी कोविड केअर सेंटर सुरू करताना महापालिकेने काही परवानग्या घेणे बंधनकारक केले आहे़ त्यानुसार शहरात सुरू असलेल्या सर्व खाजगी सीसीसीचे ऑडिट करण्याचे आदेश विभागीय वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत़
यानुसार खासगी सीसीसीची जागा अर्जदाराची स्वत:ची आहे की भाडेतत्त्वावर, जागा भाडेतत्त्वावर असल्यास नोंदणीकृत भाडेकरार, कोविड केअर सेंटरच्या इमारतीचे पुणे मनपा बांधकाम विभागाचे भोगवटापत्र, हॉटेल-लॉजिंग/वसतिगृह असल्यास त्याचा पुणे मनपा आरोग्य विभागाचा अद्ययावत परवाना प्रत, अग्निशमन दलाचे अद्ययावत ना-हरकत प्रमाणपत्र, पोलीस विभागाचा कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा ना हरकत दाखला, जागा मालकाचे संमतिपत्र या सात कागदपत्रांची तपासणी करणार आहे़
--
चौकट
सीसीसीमधील डॉक्टरांची प्रमाणपत्रे आवश्यक
खाजगी कोविड केअर सेंटरचे ऑडिट करताना महापालिकेकडून, संबंधित कोविड केअर सेंटरमधील जबाबदार डॉक्टरांचे रूग्ण देखरेखीबाबतचे संमतिपत्र घेण्यात येणार आहे़ तसेच त्यासोबतच संबंधित डॉक्टरांचे वैद्यकीय शिक्षणाची प्रमाणपत्रे व संबंधित कौन्सिलकडील अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्रही तपासण्यात येणार आहे़