पुण्यात खासगी ड्रोनला परवानगी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:54+5:302021-07-01T04:09:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात कोणत्याही खासगी कार्यक्रमांसाठी सार्वजनिक ठिकाणी ड्रोनच्या वापराला परवानगी दिली जात नाही. आतापर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात कोणत्याही खासगी कार्यक्रमांसाठी सार्वजनिक ठिकाणी ड्रोनच्या वापराला परवानगी दिली जात नाही. आतापर्यंत केवळ शासकीय कामांसाठीच ड्रोनचा वापर करण्यासाठी परवानगी दिली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्र्यांनी दिली.
जम्मू येथील विमानतळावर ड्रोनच्या साहाय्याने हल्ला करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. पुण्यासारख्या महत्त्वाच्या लष्करी कार्यालये व आयुध निर्माण संस्था अशी अनेक संवेदनशील ठिकाणे येथे आहेत. येथील माहिती मिळविण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा पाकिस्तानकडून केला गेला आहे. त्यापार्श्वभूमीवर ड्रोनचा वापर करून या संस्थांची अंतर्गत माहिती घेण्याचा अथवा हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
पुणे शहरात कोणालाही खासगी कार्यक्रमासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच लष्करी आस्थापना असलेल्या परिसरात ड्रोन वापरास परवानगी दिली जात नाही. ड्रोनच्या वापरासाठी विशेष शाखेकडून परवानगी दिली जाते. कोणी परवानगी मागितली तर स्थानिक पोलीस ठाण्यांचा अहवाल मागविला जातो. त्यानंतर बंदिस्त जागेसाठी अथवा एकाच ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमासाठी परवानगी दिली जाते.
गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने व कार्यक्रमांवर बंदी असल्याने ड्रोन वापराची परवानगी मागण्यात आलेली नाही. शासकीय कामांसाठी आतापर्यंत ड्रोनची परवानगी देण्यात आलेली आहे.
......
संरक्षणविषयक सर्व प्रकारची खबरदारी घेऊन ड्रोन वापरासाठी परवानगी दिली जाते. लष्करी आस्थापनांच्या परिसरात कोणालाही ड्रोनच्या वापराची परवानगी दिली जात नाही.
मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा