चाकणमधील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन संपला, ३ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:12 AM2021-04-21T04:12:03+5:302021-04-21T04:12:03+5:30
ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यानं मध्यरात्री रुग्णालय प्रशासनाने संबंधित २० रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन आणि व्हेन्टीलेटरवर असलेल्या संबंधित रुग्णांना हलवण्याच्या सूचना ...
ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यानं मध्यरात्री रुग्णालय प्रशासनाने संबंधित २० रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन आणि व्हेन्टीलेटरवर असलेल्या संबंधित रुग्णांना हलवण्याच्या सूचना केल्या. मध्यरात्री काही रुग्णवाहिका रुग्णालयाच्या खाली उभ्या करण्यात आल्या. यातील काही रुग्णांना नातेवाईकांनी हलवले. मात्र अन्य रुग्णांच्या नातेवाईकांना कुठेही व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही. रूग्णालय प्रशासनाने सातत्याने पहाटे साडेतीन ते चार नंतर रुग्णांना देण्यासाठी ऑक्सिजन नसल्याचे सांगून सर्व रुग्णांना तातडीने अन्यत्र हलवण्याच्या सूचना केल्या. मात्र, नातेवाईक देखील हतबल झाले. अखेरीस यातील अनेक रुग्णांनी एका रुग्णालयातून अन्यत्र जाण्याच्या प्रयत्नात असतानाच ऑक्सिजन अभावी प्राण सोडले. या संपूर्ण प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं ऑक्सिजनचा तुटवडा आहेच. प्राण कंठाला आलेले असताना ऑक्सिजन मिळत नसल्याने जीव गमवावे लागणे ही अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे.
दरम्यान, चाकणमधील संबंधित खासगी रुग्णालयात ऑक्सिजन संपल्यानंतर, सोमवारी (दि. १९ एप्रिल ) खुद्द नातेवाईकांनी चाकण जवळील महाळुंगे येथून ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्यासाठी धावाधाव केली. त्यानंतर काही ऑक्सिजन सिलिंडर मिळाले. मात्र, मंगळवारी पहाटे ते सिलिंडर सुद्धा संपले. त्यामुळे तब्बल ३ कोरोना रुग्णांची जीवनयात्रा देखील संपली. यात आणखी काही मृत्यू झाले आहेत का? याबाबतची पडताळणी सुरू असल्याचे चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी सांगितले. मृत्यू झालेल्यांपैकी ३ मृतदेहांवर चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरातील गॅसदाहिनीत मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यांत २५ वर्षीय युवक, ४५ वर्षीय इसम आणि ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
-