शहरातील खासगी वाहतूक शुक्रवारपासून महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 07:13 AM2018-05-30T07:13:22+5:302018-05-30T07:13:22+5:30
सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे पुढील काळात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्कूल बससह खासगी कंपन्यांना सेवा देणाऱ्या बस
पुणे : सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे पुढील काळात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्कूल बससह खासगी कंपन्यांना सेवा देणाऱ्या बस, टेम्पो, ट्रकच्या भाडेदरात १५ ते २५ टक्के वाढ करण्याच्या निर्णय संघटनांनी घेतला असून येत्या शुक्रवारपासून (दि. १) ही भाडेवाढ लागू होणार आहे. ट्रक, टेम्पोचे भाडे वाढणार असल्याने भाजीपाला, तसेच इतर वस्तूंची महागाई वाढण्याची शक्यता आहे.
मागील काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे बस, टेम्पो, ट्रक वाहतूकदारांनी काही काळ झळ सोसून आता भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दि पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून वाहतूक भाडेदरात शुक्रवारपासून २० ते २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. दि पूना बस ओनर्स असोसिएशननेही दि. १ जूनपासून बस भाडे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. टेम्पो पंचायतीकडून डिझेल दरवाढीवर चिंता व्यक्त केली आहे.
एसटीने भाडेवाढ करावी
खासगी लक्झरी बसचे भाडे एसटी महामंडळाच्या बसभाड्याशी संलग्न आहे. त्यामुळे एसटी भाड्याच्या दीडपटीपेक्षा आम्ही भाडे आकारू शकत नाही. सध्याचे भाडे परवडणारे असले, तरी सातत्याने डिझेल दरवाढ होत असल्याने नफा कमी झाला आहे. ही दरवाढ सुरूच राहिल्यास तोटा सहन करावा लागेल. त्यामुळे एसटीने वेळीच तिकीट दरात वाढ करावी. जेणेकरून खासगी बसचे भाडेही त्या प्रमाणात वाढेल.
- बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष,
पुणे जिल्हा लक्झरी बस असोसिएशन
विद्यार्थ्यांचा खर्च वाढला
स्कूल बस वाहतुकदारांनी भाडेदरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी वाहतुक महागली आहे. त्यामुळे एकीकडे शाळेचे शुल्कवाढ आणि आता वाहतुक भाडेही वाढल्याने पालकांचा खिसा रिकामा होणार आहे.
पुणे बस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जुनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूल बस भाडेवाढीमध्ये डिझेल दरवाढीचा ५० टक्के वाटा आहे. तसेच बदललेल्या बस नियमावलीमुळे बसेसमध्ये विविध बदल करावे लागत आहेत. चालक, महिला सहायकांचे वेतन वाढले आहे.