सातारा रस्त्याला खासगी वाहतुकीचे ग्रहण, प्रवाशांची होतेय लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 12:02 AM2018-11-12T00:02:32+5:302018-11-12T00:03:33+5:30
स्वारगेट ते कात्रज सहा किलोमीटर अंतरावर पंचमी चौक, पुष्पमंगल चौक, नातूबाग, पद्मावती, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, मोरे बाग व कात्रज असे सहा बस थांबे दुतर्फा आहेत.
धनकवडी : प्रचंड प्रवासी वाहतूकसंख्या असणाऱ्या सातारा रस्त्यावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि ट्रॅव्हल बसेस, कंपनीच्या बसेस स्कूलबस, सिक्स सीटर यांना थांबण्यासाठी निश्चित असे ठिकाण नसल्यामुळे संपूर्ण सातारा रस्ता दुतर्फा अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. यावर महापालिकेचा वाहतूक नियोजन विभाग, वाहतूक पोलीस यांचे होणारे दुर्लक्ष सर्वसामान्यांना धोकादायक ठरते आहे.
स्वारगेट ते कात्रज सहा किलोमीटर अंतरावर पंचमी चौक, पुष्पमंगल चौक, नातूबाग, पद्मावती, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, मोरे बाग व कात्रज असे सहा बस थांबे दुतर्फा आहेत. या बस थांब्यावर बस थांबताना, तसेच बीआरटी मार्गाचे काम चालू असल्याने या मार्गातून खासगी वाहने जात असल्याने वाहतूककोंडीबरोबरच अपघातजन्य परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे. सातारा रस्त्यावर दर दहा मिनिटाला ही परिस्थिती निर्माण होत आहे. खासगी वाहनचालक यांच्यावर कोणाचाही धाक नसल्याने त्यांची अरेरावी वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रवासी घेणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणारे हे खासगी वाहतूकदार सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळत आहेत. अपघात होईल, मागील गाडी अचानक येऊन धडकेल, याची आजिबात पर्वा केली जात नाही.
पुणे - सातारा रस्ता, कात्रज कोंढवा बाह्यवळण महामार्ग, कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्ग या मार्गावर दिवसभर खासगी लक्झरी बसेसची वर्दळ असते. या बस प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावर कोठेही बेकायदा थांबे घेतात. यामुळे वाहतूककोंडी होते. व्होल्गा चौक, पद्मावती, कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्ग या ठिकाणाहून खासगी वाहतूकदारांच्या गाड्या सुटताना प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते. कात्रज चौकात शिरवळ, नसरापूर, भोर, सांगली, सातारा, कोल्हापूर-मिरज, कर्नाटककडे जाणारे दुधाचे टँकर, खासगी कंपनीच्या गाड्या, लक्झरी बस, जीप प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावरच थांबल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरू लागले आहेत. रुंदीकरणानंतर जागेत अतिक्रमणे झाली आहेत.
खासगी वाहतुकीचे दर : सणासुदीला प्रवाशांची लूट
४जोडून येणाऱ्या सुट्या आणि सणासुदीच्या काळात नोकरीनिमित्ताने शहरात राहणाºया नागरिकांचे गावी जाण्याचे प्रमाण अधिक असते. उपलब्ध गाड्या आणि प्रवासीसंख्या यांच्या व्यस्त प्रमाणाचा फायदा घेऊन खासगी वाहतूकदार प्रवाशांची अडवणूक करून जादा दराची मागणी करतात. वास्तविक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तिकिटाच्या तुलनेत कमाल दीडपट वाढीव दर आकारण्याची परवानगी खासगी वाहतूकदारांना देण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी खासगी वाहतूकदार एसटीच्या तिकीट दराच्या तुलनेत दुप्पट - तिप्पट अधिक दर आकारत राज्य सरकारचा नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची लूट करीत आहेत.