दिल्ली, कोलकाता, पाटणा, भोपाळसह सहा शहरांना पुण्यातून खासगी रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:13 AM2021-08-26T04:13:07+5:302021-08-26T04:13:07+5:30
आलिशान प्रवास : पण असणार महागडा प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नॅशनल ...
आलिशान प्रवास : पण असणार महागडा
प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नॅशनल मोनेटायझेशन पाइपलाईन (एमएनपी) जाहीर केले. त्यानुसार विविध क्षेत्रातील सरकारी मालमत्तातील भागीदारी विकून किंवा भाड्याने देऊन केंद्र सरकार ६ लाख कोटी रुपये उभारणार आहेत. यातले १.२ लाख कोटी रुपये रेल्वेच्या खासगीकरणातून उभे राहणार आहेत. यासाठी देशातील चारशे रेल्वे स्थानके, ९० प्रवासी रेल्वे गाड्या, १५ रेल्वे मैदाने आणि २६५ मालधक्के भाड्याने दिले जाणार आहे. ज्या ९० प्रवासी रेल्वे खासगी होणार आहेत. त्यात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या सहा लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे.
पुणे-दिल्ली, पुणे-भोपाळ, पुणे-पाटणा, पुणे-हावडा, पुणे-दिब्रूगड आणि पुणे -प्रयागराज या पुण्यातून सुटणाऱ्या सहा गाड्या खासगी होतील. खासगी कंपनीसाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तत्पूर्वीच रेल्वे मंत्रालयाने मार्गांचे नियोजन केले आहे. यासाठी रेल्वेने १२ क्लस्टर जाहीर करताना संबंधित गाड्याचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. खासगी गाड्यांमधला प्रवास अधिक आरामदायी, स्वच्छ आणि आलिशान होणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात त्यासाठी जास्त तिकीट दर मोजण्याची तयारी ठेवावी लागेल.
चौकट
ह्या गाड्या धावणार ‘खासगी’
१. पुणे-दिल्ली- पुण्याहून रोज संध्याकाळी सहा वाजता सुटेल. दिल्लीला दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पोहोचेल. दिल्लीतून ३ वाजून २० मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी सकाळी अकराला पुण्यात पोहोचेल.
२. पुणे-भोपाळ - आठवड्यातून तीन दिवस धावेल. सोमवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी पुण्यातून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सव्वाचार वाजता भोपाळला पोहोचेल. बुधवार, रविवार व शुक्रवारी भोपाळहून सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.
३. पुणे-पाटणा-आठवड्यातून दोन दिवस धावेल. पुण्याहून सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता पाटण्याला पोहोचेल. पाटण्याहून रात्री ११ वाजून १० मिनिटांनी निघेल आणि पुण्याला तिसऱ्या दिवशी पहाटे सव्वापाच वाजता पोहोचेल.
४. पुणे-हावडा-आठवड्यातून दोन दिवस धावेल. पुण्यातून गुरुवारी व रविवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी निघेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता हावडा येथे पोहोचेल. हावडा येथून मंगळवारी, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.
५. पुणे-प्रयागराज-आठवड्यातून तीन दिवस धावेल. पुण्यातून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी रात्री १० वाजून २० मिनिटांनी निघेल. प्रयगराजला दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता पोहोचेल. प्रयागराज स्थानकावरून दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि पुण्यात दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता पोहचेल.
६ पुणे-दिब्रूगड (आसाम) - आठवड्यातून एकदा धावेल. पुण्यातून दर रविवारी सकाळी साडेदहा वाजता निघून दिब्रूगडला बुधवारी सकाळी साडेपाच वाजता पोहोचेल. दिब्रूगडगून बुधवारी सकाळी पावणेदहा वाजता सुटून दोन दिवसांनी पहाटे साडेचार वाजता पुण्यात पोहोचेल.
चौकट २
तीस मिनिटे आधी, अधिक वेगानेही
पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या ज्या सहा रेल्वे मार्गांची निवड केली आहे, त्यात दिल्ली व हावडासाठी सर्वाधिक ‘वेटिंग’ असते. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने भरपूर प्रवासी मिळून उत्पन्न वाढेल या आशेने खासगीकरणासाठी या मार्गांची निवड केली आहे. भारतीय रेल्वेच्या तीस मिनिटे आधी खासगी रेल्वे सुटेल. तसेच त्याचा वेग जास्त असेल. पुण्याहून दिब्रूगड या मार्गावर तर पहिल्यांदाच थेट रेल्वे धावणार आहे.