प्रियंका जाेशी यांचा ब्रिटनच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:56 PM2018-06-14T17:56:22+5:302018-06-14T18:11:20+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची माजी विद्यार्थीनी असलेल्या प्रियंका जोशी (वय २९) यांचा ‘व्होग’ या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.

priyanka joshi listed as a most influenceing women in britan | प्रियंका जाेशी यांचा ब्रिटनच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश

प्रियंका जाेशी यांचा ब्रिटनच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोइन्फॉरमॅटिक्स व बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या प्रियंका जोशी (वय २९) यांचा ‘व्होग’ या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये समावेश केला आहे. याबरोबरच प्रियंका यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. फोर्ब्स या जगप्रसिद्ध नियतकालिकाने "अंडर ३०, सायन्स अँड हेल्थकेअर’ या अंकामध्ये विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या तरुणांच्या (३० वर्षांखालील) यादीमध्ये प्रियंका यांचा समावेश करुन नुकताच त्यांच्या संशोधनात्मक कार्याचा गौरव केला होता. प्रियंका यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठामधून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठामध्ये संशोधन करण्यास सुरुवात केली होती.
    
प्रियंका यांच्या संशोधनामुळे मानवी मेंदूतील लहान रेणूंच्या औषधे आणि चयापचय्यांना ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. अलझायमर्स रोगाचे मूळ कारण समजले जाणारे अमाइलॉइड बीटा प्रथिने क्लंप तयार होण्याशी या प्रक्रियेचा निकटचा संबंध आहे. या संशोधनांतर्गत त्यांनी लहान रेणुंचा साठा (मॉलिक्युल लायब्ररी) तयार केली. यामधून केंब्रिज विद्यापीठामध्ये अल्झायमरवरील औषध तयार करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या संशोधनास बळ मिळाले.

"फोर्ब्स मासिकाने विज्ञान क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाच्या तरुण चेहऱयांपैकी एक असा प्रियंकाचा गौरव केला तेव्हा तिची नुकतीच कुठे पीएच. डी झाली होती. सध्या केंब्रिज विद्यापीठामध्ये रिसर्च फ़ेलो म्हणून कार्यरत असलेल्या प्रियंकाने अल्झायमर्स आजारावरील संशोधनामध्ये आघाडी घेतली आहे. मेंदुविषयक आजारांसंदर्भात प्रियंकाने तयार केलेली ’मॉलिक्यूल लायब्ररी’ हे असामान्य संशोधन म्हणून वाखाणण्यात आले आहे. ’डिमेंशिया’मुळे इंग्लंड व वेल्समधील महिलांच्या होणाऱ्या मुत्युंचे प्रमाण वाढत असताना प्रियंकाचे हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे,” अशा शब्दांत ‘बायोकेमिस्ट’ प्रियंकास व्होगने गौरविले आहे.

व्होगने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जुलैतील अंकासाठीच्या मुखपृष्ठावर प्रियंका यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. व्होगने या यादीत हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध कादंबरीमालिकेच्या लेखिका जेके रोलिंग यांनाही स्थान दिले आहे.
 

Web Title: priyanka joshi listed as a most influenceing women in britan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.