कँटोन्मेंटच्या उपाध्यक्षपदी प्रियांका श्रीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:10 PM2018-04-09T13:10:40+5:302018-04-09T13:10:40+5:30
पुणे कँटोन्मेंट बोर्डाची जानेवारी २०१५ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला उपाध्यक्षपद भूषवता यावे यासाठी पक्षाने रोटेशन पध्दत सुरू केली.
पुणे : पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी प्रियांका श्रीगिरी यांची निवड आज सर्वसाधारण सभेत करण्यात आली. पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष राजीव सेठी यांनी घोषणा केली. अतुल गायकवाड यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी उपाध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला होता. आज ते १० एप्रिल रोजी उपाध्यक्ष पदावरून पायउतार झाले. गायकवाड यांच्या अगोदर भाजपच्या नगरसेवक किरण मंत्री आणि दिलीप गिरमकर यांनी बोर्डाचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे उर्वरित सदस्य विवेक यादव आणि प्रियांका श्रीगिरी या दोघांपैकी कोणाच्या गळयात माळ पडते, त्याची उत्सुकता होती. या पदासाठी दोघांकडून वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यात येत होती. बोर्डाच्या अध्यक्षपदी ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर उपाध्यक्षपद लोकप्रतिनिधींमधून नियुक्त करण्यात येते.
दरम्यान, पुणे कँटोन्मेंट बोर्डाची जानेवारी २०१५ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला उपाध्यक्षपद भूषवता यावे यासाठी पक्षाने रोटेशन पध्दत सुरू केली. त्यानुसार मार्च २०१५ मध्ये नगरसेविका डॉ. किरण मंत्री यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनी मार्च २०१६ मध्ये राजीनामा दिला. त्यानंतर १५ मार्च २०१६ रोजी गिरमकर यांच्याकडे हे पद आले. तसेच गिरमकर यांना एक वर्ष झाल्यावर १६ मार्च २०१७ रोजी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर १० एप्रिल २०१७ रोजी अतुल गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आपली मुदत संपल्यावर गायकवाड यांनी राजीनामा दिला असून, तसे पत्र बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर राजीव सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांना दिले होते. राजीनामा पत्राची प्रत शहर भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले, राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडेही दिली होती. दरम्यान, सोमवारी झालेल्या बैठकीत प्रियांका श्रीगिरी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.