हिंदुत्ववादी विचार मानवतेच्या कक्षेत बसणारा नाही : डॉ. रावसाहेब पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:28 AM2020-12-16T04:28:38+5:302020-12-16T04:28:38+5:30
पुणे : सध्याच्या काळात हिंदुत्त्ववादी विचार पेरण्याचे काम सुरू आहे. मात्र हा विचार संकुचित असून, तो जगातील मानवतेच्या कक्षेत ...
पुणे : सध्याच्या काळात हिंदुत्त्ववादी विचार पेरण्याचे काम सुरू आहे. मात्र हा विचार संकुचित असून, तो जगातील मानवतेच्या कक्षेत बसत नाही. यासाठी पुरोगामी विचार घेऊनच पुढे गेले पाहिजे. त्यातूनच परिवर्तनवादी आणि सुधारणावादी महाराष्ट्र निर्माण होईल असे मत अखिल भारतीय जैन मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. रावसाहेब पाटील यांनी मंगळवारी (दि. १५) व्यक्त केले.
सोलापूरात येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या पंचविसाव्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते पुणेरी पगडी घालून करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार, कलागौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड अभय छाजेड, ‘संवाद’चे सुनील महाजन, डॉ शैलेश गुजर आणि जैन सहयोग पुणेचे मिलिंद फडे यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र आणि जैन धर्म यांचा निकटचा संबंध असून, त्याला ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी आहे. जैन साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय महाराष्ट्रातील प्राचीन संस्कृतीचे ज्ञान अवगत होणार नाही असे डॉ. पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, महावीरांनी अहिंसेमध्ये न्याय दडलेला आहे याचीच एकप्रकारे शिकवण दिली. नंतर तोच विचार महात्मा फुले यांनी समतेच्या माध्यमातून मांडला.
प्रा मिलिंद जोशी म्हणाले, जैन धर्माने आचार व विचारांना महत्व दिले आहे. पण आज यात दरी निर्माण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शाब्दिक हिंसाचार वाढत आहे. त्यामुळे समाज मन दुभंगत आहे ते कसं सावरायचं हे मोठे आव्हान आहे. मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण वाळिंबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
--------------------------------------------