Pro Kabaddi League : जयपूरचा गुजरातवर सहज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 05:44 PM2024-12-11T17:44:16+5:302024-12-11T17:45:52+5:30

मध्यंतराला जयपूर संघाने २७-१६ अशी आघाडी मिळविली होती.

Pro Kabaddi League Jaipur easily beat Gujarat in Pro Kabaddi League tournament   | Pro Kabaddi League : जयपूरचा गुजरातवर सहज

Pro Kabaddi League : जयपूरचा गुजरातवर सहज

पुणे : अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत खोलवर चढायांच्या जोरावर जयपुर पिंक पँथर्स संघाने गुजरात जाएंट्स संघाचा ४२-२९ असा सहज पराभव करून या स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. मध्यंतराला जयपूर संघाने २७-१६ अशी आघाडी मिळविली होती.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत गुजरात व जयपूर या दोन्ही संघांची आजपर्यंतची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. गुजरातने १७ सामन्यांपैकी फक्त पाच सामने जिंकले आहेत. याचबरोबर जयपुरला देखील फारशी चमकदार कामगिरी करता आली. त्यांनी १७ सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. त्यामुळेच या दोन्ही कमकुवत संघांमध्ये आज कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती.

सुरुवातीपासूनच जयपूरने आघाडी घेतली होती. आठव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण नोंदवीत १३-५ अशी आघाडी मिळविली. गुजरात संघाच्या खेळाडूंनी ही पिछाडी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला जयपूरकडे १७-८ अशी आघाडी होती. पंधराव्या मिनिटाला त्यांनी दहा गुणांची आघाडी मिळवली होती. जयपूरच्या भक्कम बचावतंत्रापुढे गुजरातच्या चढाईपटूंच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. मध्यंतराला चार मिनिटे बाकी असताना जयपूरने आणखी एक लोण चढवीत आपली बाजू बळकट केली. त्यावेळी त्यांच्याकडे २६-१४ अशी आघाडी होती.

उत्तरार्धात सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला जयपूर ३४-२१ असा आघाडीवर होता. पाच मिनिटे बाकी असताना जयपूरने ३८-२६ अशी आघाडी टिकवत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. जयपूरच्या विजयात अर्जुन देशवाल, नीरज नरवाल यांनी केलेल्या चढायांचा मोठा वाटा होता. गुजरातकडून सुपररेड टाकणारा गुमान सिंग व राकेश यांचा अपवाद वगळता एकही खेळाडू फारशी चमक दाखवू शकला नाही.


बंगालची बंगळुरूवर मात

सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामन्यावर नियंत्रण ठेवत बंगाल संघाने बंगळुरूवर ४४-२९ अशी मात केली आणि प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या. पूर्वार्धात बंगाल संघाकडे २२-१२ आघाडी होती. बंगालने बंगळुरू विरुद्ध हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत सुरुवातीपासून रणनीती अमलात आणली. सुरुवातीपासून आघाडी घेत त्यांनी सामन्याच्या पंधराव्या मिनिटाला पहिला लोण नोंदविला. मध्यंतराला त्यांनी २२-१२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. उत्तरार्धातही बंगालच्या खेळाडूंनी खेळावर नियंत्रण मिळवले. सामन्याच्या २८ व्या मिनिटाला त्यांनी आणखी एक लोण नोंदवित ३३-१९ अशी आघाडी मिळविली. शेवटची चार मिनिटे बाकी असताना बंगाल संघाकडे ३९-२६ अशी मोठी आघाडी होती.

Web Title: Pro Kabaddi League Jaipur easily beat Gujarat in Pro Kabaddi League tournament  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.