Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगमध्ये पाटणा पायरट्स उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 17:27 IST2024-12-27T17:26:51+5:302024-12-27T17:27:37+5:30
यु मुम्बावर ३१-२३ असा विजय : देवांक, अयान विजयाचे शिल्पकार

Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगमध्ये पाटणा पायरट्स उपांत्य फेरीत
पुणे : प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यात पाटणा पायरट्सने नियोजनबद्ध खेळ करताना यु मुम्बाचे आव्हान ३१-२३ असे परतवून लावले. देवांक आणि अयानच्या चढायांबरोबर गुरदीपचा बचाव पाटणा संघाचे वैशिष्ट्य ठरला. पाटणा संघ यापूर्वी तीन वेळा लीगचा विजेता असून, गेल्या वर्षी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
देवांकची कोंडी करण्यात एकवेळ यु मुम्बाला यश आले होते. मात्र, त्या प्रत्येक क्षणी अयान आपल्या संघासाठी योद्ध्यासारखा लढला. मुम्बाच्या बचावफळीला सातत्याने आव्हान देत त्याने चांगले गुण मिळवले. अयानने पूर्ण केलेले सुपर टेन आणि गुरदीपचे हायफाईव्ह पाटणासाठी निर्णायक ठरले. पाटणाने बचाव आणि चढाई या दोन्ही आघाडीवर दाखवलेला संयम निर्णायक ठरला. मुम्बा खेळाडूंना चुका करायला भाग पाडून एक सफाईदार विजयाची नोंद केली. मुम्बाकडून एकही खेळाडू चमक दाखवू शकला नाही.
यु मुम्बाने पहिल्याच चढाईला देवांकची पकड करून आपले मनसुबे स्पष्ट केले. पण, त्यांना ही सुरुवात टिकवून ठेवता आली नाही. अयानने अचूक चढाया करून देवांकला पुन्हा मैदानात आणले. त्यानंतर या दोघांच्या चढाईमुळे पहिल्या दहा मिनिटात यु मुम्बावर एक लोण देत पाटणा पायरट्सने वर्चस्व राखले होते. पूर्वार्धातील दुसऱ्या सत्रात मात्र त्यांनी खेळ संथ केला.
झफरदानेशच्या एका चढाईने पाच गुणांची कमाईचा यु मुम्बाचा आनंद फार काळ टिकला नाही. मैदानावरील पंचांनी पाच गुण दिल्यानंर पाटणाने तिसऱ्या पंचाची मदत घेतली. तेव्हा झफरदानेशची बोटे केवळ मध्य रेषेपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट झाले. यु मुम्बालाच एक गुण गमवावा लागला. त्यानंतर डु ऑर डायच्या चढाईत रोहित राघवने गडी टिपल्याचा गुण तिसऱ्या पंचांनी नाकारला. पाटणाने योग्य वेळी तिसऱ्या पंचाची मदत घेत आपली बाजू सुरक्षित केली. यु मुम्बाच्या अजित चौहान आणि मनजीतला चढाईत फारशी चमक दाखवता आली नाही. मध्यंतराला पाटणा संघाने १७-११ अशी आघाडी मिळवली.
उत्तरार्धाच्या सुरुवातीला पाटणाने खेळाची गती संथच ठेवली. देवांक अपयशी ठरल्यानंतर अयानने यु मुम्बाला निराश केले. पाटणाच्या बचावफळीने कमालीचा संयम राखला. त्यांनी यु मुम्बाच्या चढाईपटूंना आव्हान दिले. त्यांना पूर्ण खोलवर चढाई करण्यास भाग पाडले. चढाईपटू खोलवर आल्यावर पाटणाने संघाने पकडी केल्या. सहा मिनिटे बाकी असताना यु मुम्बाला अखेर अयानची पकड करण्यात यश आले. पण, याचा फायदा त्यांना उठवता आला नाही. सामना संपण्यास तीन मिनिटे असताना पाटणाने २८-१८ अशी भक्कम आघाडी घेतली. चढाईपटूंनी नंतर उर्वरित वेळ काढण्याचे अचूक तंत्र अवलंबले आणि चमकदार विजय मिळवून विजयावर शिक्कामोर्तब केले.
युपी योद्धाज प्रथमच उपांत्य फेरीत
भवानी राजपूत आणि गगन गौडाच्या परिपूर्ण चढायांच्या खेळाला हितेश, सुमित, महेंद्र सिंग या बचावफळीकडून मिळालेल्या तेवढ्याच तगड्या साथीमुळे युपी योद्धाज संघाने दोनवेळच्या माजी विजेत्या जयपूर पिंक पॅंथर्स संघाचा ४६-१८ असा २८ गुणांनी धुव्वा उडवून थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्यांची गाठ हरियाना स्टिलर्सशी पडणार आहे.