Pro Kabaddi League : सर्वोत्तम खेळ करणारा संघ ठरेल विजेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 19:12 IST2024-12-26T19:10:53+5:302024-12-26T19:12:35+5:30
प्रो-कबड्डी लीगच्या बाद फेरीत दाखल झालेल्या संघांच्या प्रशिक्षकांना विश्वास

Pro Kabaddi League : सर्वोत्तम खेळ करणारा संघ ठरेल विजेता
पुणे : बाद फेरीत चुकांना संधी नसते. सर्वोत्तम खेळ करणारा संघच येथे जिंकणार. मोठ्या लढतींचा दबाब कुठला संघ व्यवस्थित हाताळतो, यावरही बरेच काही अवलंबून असते, असे मत प्रो-कबड्डी लीगच्या बाद फेरीत दाखल झालेल्या संघाच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केले.
हरियाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली या संघांनी यंदाच्या मोसमात गुणतक्त्यात अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवून थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता यूपी योद्धाज वि. जयपूर पिंक पँथर्स यांच्यात एलिमिनेटर -१, तर पाटणा पायरेट्स वि. यू मुम्बा यांच्यात एलिमिनेट-२ लढत रंगणार आहे. या लढती म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व संघांचे प्रशिक्षक एकत्र आले होते.
हरयाणाचे प्रशिक्षक मनप्रीतसिंग म्हणाले की, येथे प्रत्येक संघ जिंकायलाच आला आहे. आता स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचा प्रतिस्पर्धी कोण याचा विचार न करता जमेच्या बाजूंवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत.
दिल्लीचे प्रशिक्षक जोगिंदर नरवाल म्हणाले की, जो संघ चांगला खेळणार, तो जिंकणारच. आमची संघ बांधणी मजबूत असून, याचे श्रेय माझ्यापेक्षा खेळाडूंनाच आहे. हीच एकजूट आम्ही उपांत्य फेरीत दाखविणार आहोत.
पाटणा संघाचे प्रशिक्षक नरेंदर रेधू म्हणाले की, या मोसमात आम्ही काही लढती अखेरच्या क्षणी जिंकल्या आहेत. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. शेवटच्या क्षणी कच न खाणे हे आमच्या संघाचे वैशिष्ट्ये आहे.
यूपी संघाचे प्रशिक्षक जसवीर म्हणाले, गेल्या मोसमात आमची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यानंतर संघात काय बदल करता येईल, याचा विचार आम्ही केला. संघात थोडे बदल केले. झालेल्या चुकांचा आढावा घेतला. त्यामुळेच तुम्ही या वेळी एक चांगला संघ बघत आहात.
जयपूर संघाचे प्रशिक्षक संजीव बलियान म्हणाले की, मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा आम्हाला अनुभव आहे. दबाव हाताळण्याचे हे कौशल्या आम्हाला उपयोगी पडणार आहे. यू मुम्बाचे प्रशिक्षक घोलमरेझा माझांदरनी म्हणाले, आम्ही प्रत्येक लढतीचा आनंद घेत आहोत. आमच्याकडे अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल आहे.