शेतकऱ्यांची निविष्ठेची अडचण मिटणार
By admin | Published: May 18, 2017 05:41 AM2017-05-18T05:41:27+5:302017-05-18T05:41:27+5:30
सध्या पुणे विभागातील निविष्ठा विक्रेत्यांना खताचा ६१ हजार मेट्रिक टन, तर २४ हजार ४६ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या पुणे विभागातील निविष्ठा विक्रेत्यांना खताचा ६१ हजार मेट्रिक टन, तर २४ हजार ४६ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या निविष्ठांचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात पुरवठा होणार असून, शेतकऱ्यांना निविष्ठाच्या अडचणी येणार नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
पुणे विभागात खरिपाचे सात लाख ८८ हजार ४८० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात दोन लाख ३० हजार ८३० हेक्टर, सोलापूरमध्ये ८९ हजार ०२० हेक्टर क्षेत्र व नगर जिल्ह्यात ४ लाख ७८ हजार ६४० आहे. पैकी चालू वर्षी खरिपाची पेरणी मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. खरिपासाठी सात लाख २० हजार ३७९ मेट्रिक टन खताची, तर एक लाख २३ हजार ७८०क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाकडे आली होती. कृषी विभागाने गावपातळीवरच्या निविष्ठा विक्रेत्यामार्फत निविष्ठाचा पुरवठा करण्यास सुरुवात गेल्या महिन्यापासून केली आहे. पुणे विभागात यंदा आत्तापर्यंत झालेल्या खताच्या पुरवठ्यामध्ये पुणे २४ हजार, नगर १९ हजार व सोलापूर जिल्ह्यात १८ हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. तसेच, बियाण्यांचा महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व खासगी कंपन्यांकडून पुरवठा करण्यात येत आहे. आत्तापर्यंत विभागातील नगर जिल्ह्यात १४ हजार २४८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. पुणे जिल्ह्यात ६ हजार ३९७, सोलापूर जिल्ह्यात तीन हजार ४०१ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे.
मागील वर्षी रब्बी हंगामात पुरवठा करण्यात आलेल्या रासायनिक खतापैकी पुणे विभागात सुमारे एक लाख ४८ हजार १५० मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे या खताचा वापर यावर्षी खरीप हंगामासाठी करता येऊ शकणार आहे.
पुणे जिल्ह्यात ४३ हजार ९६२, नगर २६ हजार ५६७ व सोलापूर ७७ हजार ६२१ मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. यामध्ये युरिया, डीएपी, एस.एस.पी, एमओपी आणि संयुक्त खताचा समावेश आहे.