भोर शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर
By admin | Published: March 26, 2017 01:31 AM2017-03-26T01:31:30+5:302017-03-26T01:31:30+5:30
अपुरे कर्मचारी व अपुऱ्या घंटागाड्यामुळे भोर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कचऱ्याचे ढीगच्या
भोर : अपुरे कर्मचारी व अपुऱ्या घंटागाड्यामुळे भोर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचत आहेत. मोकाट जनावरे फिरत असून कचरा रस्त्यावर येत आहे. यातून रोगराई वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
कचरा गोळा करण्यासाठी तीन घंटागाड्या आहेत. मात्र, त्या गाड्या अपुऱ्या पडत असल्याने संपूर्ण शहरातील कचरा एका वेळी उचलला जात नाही. अजून गाड्यांची गरज आहे.
गाड्या चार-चार दिवस एका गल्लीत जात नसल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावरील कचराकुंड्यात टाकतात. काहींनी नवीन कचराकुंड्या तयार केल्या आहेत. यामुळे शहरात रोगराई वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
घंटागाड्या वाढवून शहरातील कचरा रोजच्या रोज कसा बाहेर जाईल याकडे भोर नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय शहराबाहेर संरक्षक भिंत घालणे गरजेचे आहे. कचरा रोजच्या रोज जाळला जात नसल्याने वाऱ्याने
उडून शेतात जात असल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पुढील महिन्यात नवीन तीन घंटागाड्या येणार असल्याने शहरातील कचऱ्याची समस्या कायमची सुटणार असल्याचे नगराध्यक्ष तृप्ती किरवे यांनी सांगितले.(वार्ताहर)