शेतकऱ्यांच्या वाढीव वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:45+5:302021-09-26T04:11:45+5:30
वाल्हे : महाविकास आघाडीने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार सकारात्मक ...
वाल्हे : महाविकास आघाडीने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार सकारात्मक निर्णय घेईल. येत्या महिनाभरात उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, जलसंपदामंत्र्यांची एकत्रित बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या वाढीव वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.
मांडकी (ता.पुरंदर) येथील मांडकी व भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्यावतीने शनिवारी पुरंदर तालुक्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांचा आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी सभापती नंदूकाका जगताप, अनिल उरवणे, रवींद्र सणस, प्रदीप पोमण, सरपंच प्रियांका शिंदे, उत्तम धुमाळ, उपसरपंच विश्वास जगताप, अनंता तांबे, महेंद्र माने, राजेंद्र बरकडे, सतीश जगताप, सुधीर निगडे, अंकुश जगताप, प्रवीण जगताप आदींसह तालुक्यातील विविध सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह महावितरण सासवडचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, योगेश बुरसे, अतुल जाधव उपस्थित होते.
संजय जगताप म्हणाले की, ग्रामीण भागातील सहकार टिकविण्याचे काम या संस्थांनी केले आहे. तालुक्यामध्ये शेतीसाठीच्या विजेचा प्रश्न गंभीर बनल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधित खात्याच्या मंत्री व अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक लावण्यात येणार असून त्यामध्ये या सर्व अडचणींवर धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी दशरथ शिंदे, जयवंत कोंडे, ॲड. शिवदास तांबे, उत्तम धुमाळ, संजीवन जगताप, उमेश मांडके, कांचन निगडे, मानसिंग जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले. महेंद्र साळुंके यांनी प्रास्ताविक केले. सोमेश्वरचे संचालक मोहन जगताप यांनी आभार मानले.
वाढीव वीजदराचे भूत मानगुटीवरून उतरवा
महावितरणकडून आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा चारपट जास्तीच्या दराने वीजपुरवठा केला जात आहे. वाढीव वीजबिले न भरल्यास कारवाईचा बडगा दाखविला जात असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. वीज आकार पूर्वीप्रमाणेच देऊन आमच्या डोक्यावरील वीज दरवाढीचे बसलले भूत उतरवण्याची मागणी या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय जगताप यांच्यासमोर मांडली.
२५ वाल्हे
मांडकी येथील मेळाव्यात बोलताना आमदार संजय जगताप.