‘नीट’चा घोळ : पेपर उशिरा दिल्याने विद्यार्थी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:58 PM2019-05-06T12:58:11+5:302019-05-06T13:00:27+5:30
धनकवडी येथील भारती विद्यापीठ माध्यमिक शाळेमध्ये ‘नीट’चे केंद्र होते.
पुणे : नीट परीक्षेची वेळ दुपारी दोन वाजताची असताना पुण्यातील काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना ५ ते १० मिनिटे उशिरा पेपर देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या केंद्रांवर तेवढा वेळ विद्यार्थ्यांना वाढवून दिला असला तरी उशिरा पेपर दिल्याने मनोबल खचल्याने पेपर सोडविताना घाई झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिकेवर माहिती लिहिण्यातही चुक झाल्याचे प्रकारही घडले आहेत.
परीक्षेची वेळ दुपारी २ ते ५ अशी तीन तासांची होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर दुपारी १२ वाजल्यापासून सोडण्यात येत होते. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने घालून दिलेल्या निकषानुसार विद्यार्थ्यांची तपासणी करून आत सोडण्यात आले. अनेक विद्यार्थी दुपारी १२.३० वाजताच केंद्राच्या आवारात होते. त्यानंतर एक वाजता त्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दुपारी दोन वाजता परीक्षा सुरू होण्याची वेळ असल्याने त्यापुर्वी किमान १० ते १५ मिनिटे आधी विद्यार्थ्यांच्या हातात उत्तरपत्रिका देणे अपेक्षित असते. त्यावर बैठक क्रमांक व इतर माहिती लिहिण्यासाठी सर्व परीक्षांमध्ये तेवढा वेळ दिला जातो. परीक्षेची वेळ झाल्यानंतर प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जाते. त्यानंतर विद्यार्थी लगच प्रश्न सोडविण्यास सुरूवात करतात. पण पुण्यातील काही केंद्रांवर दोन वाजून गेल्यानंतर उत्तरपत्रिका दिल्याचा प्रकार घडला आहे.
धनकवडी येथील भारती विद्यापीठ माध्यमिक शाळेमध्ये ‘नीट’चे केंद्र होते. तिथे परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘परीक्षेची वेळ होऊन गेल्यानंतर दहा मिनिटांनी पेपर देण्यात आला. दोन वाजण्यास पाच मिनिट कमी असेपर्यंत ब्लॉकमध्ये पेपर न आल्याने सुपरावायझर स्वत; बाहेर गेले. त्यानंतर पाच मिनिटांनी पेपर देण्यास सुरूवात झाली. यामध्ये दहा मिनिटांचा वेळ वाया गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांची खुप घाई झाली. त्यांनी त्यावरील माहिती नंतर लिहिण्यास सांगत आधी पेपर सोडविण्याचे सुचविले. पण अधूनमधून सुपरवायझर माहिती भरण्यासाठी येत असल्याने लक्ष विचलित होत होते. पेपर सोडविण्यासाठी तेवढा वेळ वाढवून दिला तरी सुरूवातीलाच विद्यार्थी घाबरून गेल्याने नंतर त्याचा त्रास झाला. त्यामुळे सर्व प्रश्न सोडविण्यास वेळ मिळाला नाही.’ याच ब्लॉकमधील आणखी एका विद्यार्थ्याने या प्रकाराला दुजोरा दिला. तसेच शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील एका केंद्रावरही असाच प्रकार घडला. दुपारी दोन वाजता उत्तरपत्रिका देण्यात आल्याने पेपर सोडविण्यास विलंब झाल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.
.....
बाह्या कापल्या, बुट काढले
परीक्षेला येताना परीक्षार्थींनी कोणता पेहराव अंगावर ठेवावा यासंबंधीच्या सूचना एजन्सीकडून देण्यात आल्या होत्या. त्यात विद्यार्थ्यांने बूट वापरू नयेत, अंगावर रंगीबेरंगी कपडे असू नयेत, शर्टला कॉलर नसावी, पूर्ण बाह्यांचा शर्ट नको, विद्यार्थिनींनी दागिने घालू नये अशा अनेक सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे परीक्षेआधी याची कसून तपासणी करून विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. पुर्ण बाह्याचे शर्ट घालून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शर्टच्या बाह्या कापण्यात आल्या. शुज घालून आलेल्यांना ते केंद्रातच काढण्यास सांगण्यात आले. मुलींना ओढणी, दागिने काढण्यास सांगितले. नीट सुरू झाल्यापासून हे नियम असल्याने अनेकांनी त्याचे पालन केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.कोणत्याही प्रवेश परीक्षेसाठी वेळेचे खुप महत्व असते. या परीक्षेतील प्रत्येक गुण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महत्वाचा असतो.त्यामुळे पेपर मिळण्यासच १० मिनिटे विलंब झाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. हा वेळ भरून काढणे पुढे कठीण गेले. त्यामुळे काही प्रश्न सोडविण्याचे राहून गेले, असे त्यांनी सांगितले.