नवे स्थानक अडचणीचे?, वाहतूक कोंडीत भर पडण्याचीच शक्यता, व्यावसायिकांवर गदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:27 AM2017-09-23T00:27:52+5:302017-09-23T00:27:55+5:30
छत्रपती शिवाजीमहाराज या मुख्य चौकातील एसटी स्थानक मागील पाच वर्षांपूर्वी मावळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झालेल्या कारवाईत पाडण्यात आले.
कामशेत : येथील छत्रपती शिवाजीमहाराज या मुख्य चौकातील एसटी स्थानक मागील पाच वर्षांपूर्वी मावळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झालेल्या कारवाईत पाडण्यात आले. याच ठिकाणी आता आमदारांच्या पुढाकाराने पुन्हा स्थानकाचे काम सुरू झाले आहे. या नवीन स्थानकामुळे चौकातील वाहतूककोंडीत मोठी भर पडणार असून, पुन्हा एकदा गरीब टपरीधारकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे बोलले जात आहे.
जुने स्थानक सार्वजनिक बांधकाम विभागाने अनधिकृत ठरवून पाडले. किरकोळ व्यावसायिक, टपरीधारक यांचीही दुकाने पाडण्यात आली. तेव्हापासून येथे एसटी प्रवासी उघड्यावरच थांबत असून, पाच वर्षांनंतर शासनाला जाग आली आहे. आमदार निधीतून या स्थानकाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू झाले आहे.
स्थानकाअभावी प्रवाशांना इतरत्र दुकानांच्या आडोशाला उभे राहावे लागते. वाहतूककोंडी होणार नाही व गरीब व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही, अशा प्रकारे स्थानक उभारावे, अशी मागणी होती.
मागील अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर या गरिब व्यावसायिकांना हातगाडीवर व्यवसाय सुरू करावा लागला. मात्र, पुन्हा एकदा त्यांच्या व्यवसायावर गदा येणार असल्याने सर्व ते चिंताग्रस्त आहेत. चौकात फडकणारा भगवा ध्वज काढण्यात येणार असल्याने शिवप्रेमी संतापले आहेत. त्यामुळेच रविवार, दि. २४ रोजी सर्व ग्रामस्थ, शिवप्रेमी, तरुण व टपरीधारक, व्यावसायिक यांची सकाळी दहा वा. बैठक होणार आहे.
शहरात वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर उपाययोजना करण्याचे सोडून चौकात मोठे एसटी स्थानक बांधून वाहतूककोंडीत भरच पडणार असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. चौकात एसटी बसला वळण घेणेही अवघड असताना हे स्थानक झाल्यास याचा नक्की कोणाला फायदा होणार आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी स्थानकाविषयी ग्रामपंचायतीकडे कोणतीच माहिती नाही. सार्वजनिक बांधकामचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने या नव्या स्थानकात नक्की कोणाचे भले होणार आहे, असा प्रश्न काही नागरिक विचारत आहेत.
काही महिन्यांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून एसटी स्थानके उभारण्यात आली. येथेही स्थानक उभारण्याचा मानस होता. पण, पीडब्ल्यूडी व ग्रामपंचायतीने वाहतूककोंडी व व्यावसायिकांना त्रास होण्याच्या कारणावरून परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी पवनानगर चौकात स्थानक उभारले. गरिबांच्या पोटावर पाय, तसेच भगवा ध्वज काढून देणार नाही, अशी मागणी डॉ. विकेश मुथा, नीलेश दाभाडे, संजय पडवकर, मनोज धावडे, परेश बरदाडे, योगेश घारे, सचिन येवले, अश्विन दाभाडे व टपरीधारकांनी केली आहे.
काम थांबविण्याची मागणी
सुरू असलेल्या एसटी स्थानकाचे काम हे चुकीचे आहे. येथे रहदारी व गरिबांच्या व्यवसायाला त्रास होऊ शकत असल्याचे कारण देऊन या स्थानकाचे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी शिवसेना कामशेत शहर प्रमुख गणेश भोकरे व शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
>शिवसेनेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी मावळातील अनेक भागांमध्ये बस थांबे उभारण्यात आले. कामशेत येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात बस थांबा उभारण्याचा मानस होता. पण, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, वाहतूककोंडी व टपरीधारक आदी कारणे देण्यात आली. या चौकात छत्रपती शिवाजीमहाराजांचा भगवा ध्वज काढू नये. तसे झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. - राजेश खांडभोर, शिवसेना तालुकाप्रमुख
जुने बस स्थानक कारवाईत पाडले. त्या वेळी ते अनधिकृत होते असे सांगण्यात आले. आता नव्याने स्थानकाचे काम सुरू आहे, हे अधिकृत कसे काय? सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोके ठिकाणावर नाही. राजकारणी मंडळी फक्त स्वार्थासाठी समाजोपयोगी कामे करीत असून, त्यांना स्थानिक समस्यांमध्ये बिल्कूल रस नाही.
- सचिन शेडगे, अध्यक्ष,
सह्याद्री प्रतिष्ठान
>रविवारी छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील बस स्थानकाबाबत सर्वांची बैठक बोलावली असून, त्या वेळी विचारविनिमय होईल. यावर सर्वांच्या सोईने व सहकार्याने तोडगा काढण्याचा विचार सुरू आहे. मात्र, चौकातील भगवा ध्वज हलवण्यात येणार नाही, वाहतुकीला अडथळा ठरणार नाही या पद्धतीने स्थानक उभे करावे, अशी मागणी आहे.
- मनोज धावडे,
सामाजिक कार्यकर्ते