आराखड्याच्या अडचणी वाढल्या
By admin | Published: December 14, 2015 12:36 AM2015-12-14T00:36:02+5:302015-12-14T00:36:02+5:30
स्मार्ट सिटी आराखड्याला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, रिपाइं या राजकीय पक्षांसह विविध संस्था व सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला आहे
पुणे : स्मार्ट सिटी आराखड्याला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, रिपाइं या राजकीय पक्षांसह विविध संस्था व सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. स्मार्ट सिटीबाबतची मुख्यसभा सुरू असतानाच ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी आराखडा मंजुरीच्या अडचणी वाढल्या आहेत.
स्मार्ट सिटी आराखड्यातील स्पेशल पर्पज व्हेईकलच्या (एसपीव्ही) तरतुदीला नगरसेवकांचा प्रचंड विरोध आहे. ही अट वगळण्याची उपसूचना मांडल्याशिवाय स्मार्ट सिटी आराखडा मंजूर होणे अवघड आहे.
त्याचबरोबर या उपसूचनेसह स्मार्ट सिटी आराखडा मंजूर झाला, तर स्पर्धेमध्ये पुण्याच्या प्रस्तावाचा विचार होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे एकंदरीतच पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाचे भवितव्य अडचणीत सापडले आहे.
कॉँग्रेस पक्षाचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चेनंतर
पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पातून होणाऱ्या विकासाला विरोध नाही, मात्र आराखड्यातील स्पेशल पर्पज व्हेईकलमुळे (एसपीव्ही) महापालिकेची स्वायत्तता धोक्यात येणार असल्याचा आक्षेप काँग्रेसच्या नगरसेवकांनी रविवारच्या बैठकीमध्ये उपस्थित केला. त्यामुळे आराखड्याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून घेतला जाईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेमध्ये सोमवारी स्मार्ट सिटी आराखड्याबाबत राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुख्यसभा होणार आहे. यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची रविवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटी आराखड्यावर सडकून टीका केली. आयुक्तांनी महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा राज्य शासनाकडून निर्देश आणून मुख्यसभा घ्यायला लावल्याने या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. एसपीव्हीमुळे महापालिकेची स्वायत्तता धोक्यात येऊ नये, अशी आग्रही भूमिका नगरसेवकांनी मांडली.