महिला पोलिसांपुढे समस्याच
By admin | Published: February 21, 2017 03:30 AM2017-02-21T03:30:34+5:302017-02-21T03:30:34+5:30
मतदान साहित्याचे वाटप, मतदान केंद्रांची सुरक्षा, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत
पुणे : मतदान साहित्याचे वाटप, मतदान केंद्रांची सुरक्षा, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी घ्यावी लागणारी काळजी या कामांसाठी सर्व मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची, जेवणाची कोणत्याही सोयीबाबत अधिकृत सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
पोलीस स्टेशनकडून त्यांना याबाबतचे आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस महिला पोलीस कर्मचाऱ्यांना असुविधांचाच सामना करावा लागत असल्याचे चित्र ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले.
१४ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या महिला कर्मचाऱ्यांना दोन दिवस केंद्रावर थांबून ड्यूटी निभावावी लागणार आहे. मात्र, त्यांच्या निवासाची, भोजनाच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आलेले नाही. एक-दोन पोलीस स्टेशनचा अपवाद वगळता, पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणाबाबत मुख्यालयाकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस मुख्यालय जेवणाची सोय करणार की पोलीस निरीक्षकांकडून सोय केली जाणार, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.(प्रतिनिधी)
मागणीकडे दुर्लक्ष
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एखादा वर्ग खुला ठेवावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांतर्फे प्राचार्यांकडे करण्यात आली. मात्र, ती नाकारण्यात आली. निवडणूक ड्यूटीचा शिक्षकांना किमान मोबदला मिळतो. मात्र, पोलिसांना तो मिळत नसल्याची खंतही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ड्यूटी संपल्यानंतर शिक्षक घरी जाऊ शकतात. मात्र, मतदानपेट्या सील होईपर्यंत पोलिसांना हालताही येणे शक्य नसते. अशा वेळी, किमान सुविधा उपलब्ध असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
इतर जिल्ह्यांतून कुमक
निवडणूक ड्यूटीसाठी हिंगोली, परभणी, अहमदनगर आदी ठिकाणांहून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. हिंगोलीतून २२० कर्मचारी पुण्यात आले असून, त्यामध्ये ३० महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अहमदनगरवरून २५० पोलीस कर्मचारी आले असून, त्यामध्ये ५० महिला कर्मचारी आहेत. मतदान केंद्रांवरील स्वच्छतागृहांची दुरवस्था, निवासाची गैरसोय, भोजनाबाबत अनिश्तिता अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे.