थेऊरमध्ये देवाला सोडलेल्या जनावरांमुळे समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 02:58 AM2018-08-24T02:58:07+5:302018-08-24T02:58:31+5:30
मोकाट जनावरांचा धोका; नागरिकांमध्ये नाराजी
थेऊर : अंधश्रद्धेपोटी विविध नवस फेडण्यासाठी अनेक तीर्थस्थळी गाई, बैल देवाच्या नावाने सोडले जातात. नवस फेडणारा स्वत:मागचे विघ्न स्थानिक लोकांच्या माथी मारून निघून जातात, अशी भावना थेऊर येथील ग्रामस्थांत निर्माण झाली आहे.
थेऊर या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. गावातील गणपती चौक, बाजार मैदान, बसस्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही जनावरे कळपाने मोकाट फिरत आहेत. ग्रामस्थ, व्यापारी, तसेच श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. प्रशासनाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण यावर नसून मोकाट जनावरांमुळे बाजार मैदानात लावलेल्या झाडांचे नुकसान होत आहे. तसेच थेऊरच्या आठवडे बाजाराचा (बुधवार) दिवशी तर व्यापारी, शेतकरी, भाज्याविक्रेत्यांस याचा प्रचंड त्रास होत आहे. गर्दीच्या वेळीतर बाजारासाठी आलेल्या महिला, परिसरातील शेतकरी यांना कळपातील गायी, बैल धडक मारण्याची भीतीदायक वातावरण आहे. दर्शनासाठी गाड्या घेऊन आलेल्या भाविकाच्या गाडीला अडथळा निर्माण होऊन अनेकदा गाडीचे नुकसानदेखील होत आहे. रस्त्यावर बाजारात सर्वत्र या मोकाट जनावरांमुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिक तसेच भाविकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. मोकाट जनावरांचा काहीतरी ठोस उपाय ग्रामपंचायतीच्यावतीने व्हावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. दोन दिवसांपूर्वीच थेऊर तीर्थक्षेत्रालाब वर्ग श्रेणी दिली आहे. त्यामुळे शासनाकडून येणाऱ्या निधीतून स्थानिक व भाविकांसाठी काहीतरी सोय व्हावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मोकाट जनावरांचा विषय गंभीर असून संबंधित जनावरांमुळे गावात नुकसान होत आहे. ही जनावरे ज्या मालकांची असतील त्यांनी न नेल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायतीकडून नोटीस पाठवून दंडात्मक कारवाई केली जाईल.
- अप्पासाहेब काळे ,
उपसरपंच, थेऊर