पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीतून सावरतानाच पिकांना हवामानाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:53 PM2020-01-04T15:53:17+5:302020-01-04T15:59:59+5:30
शेतकरी पुन्हा संकटात...
पुणे (शेलपिंपळगाव) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. यातून सावरत असतानाच गेल्या आठवड्याभरापासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर करपा, बुरशी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पिके वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात महागडी औषधे फवारावी लागत आहे. यामुळे उत्पादनखर्च तरी मिळणार का? या विवंचनेत शेतकरी आहेत.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आला आहे. ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील मागास कांदा, गहू, मका, कोबी, फ्लॉवर, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके तसेच महत्त्वाच्या तोडीव पिकांवर विशेषत: मिरची, गवार, वांगी, वालवर पिकांवर मावा व करपा रोगराईचे सावट पसरले आहे. चालू वर्षी खरीप व रब्बी या दोन्ही ही प्रमुख हंगामात शेतकºयांना दूषित हवामानाशी सामना करावा लागला. रब्बी हंगामातील सुरुवातीच्या आगाप कांदा पिकाला अगदी लागवडीपासूनच रासायनिक औषधांची फवारणी करावी लागली. परंतु आगाप कांदा पूर्णत्वास येण्याच्या कालवधीत हवामानाने साथ सोडल्याने पिकांना रोगराईने ग्रासले आहे. परिणामी कांदा उत्पादनात कमालीची घट घडून येत आहे. खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात चासकमान कालव्याचे मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने बळीराजा खरीप व रब्बी या मुख्य दोन हंगामासह उन्हाळी हंगामात देखील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. विशेषत: या हंगामात मागास कांदा, वाल, मका, फुलझाडे, बाजरी, पालेभाज्या, तोडीव पिके तसेच फळपिके पिकवण्याकडे शेतकरी आकर्षित झाला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आला आहे.
रब्बीतील मागास कांद्याची वाढ खुंटून पिकांवर करपा, मावा व पीळ रोगांचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. आगाप कांदालागवडीला ज्या लहरी हवामानाने बाधित केले होते, त्याच प्रकारे मागास कांद्याच्याही संवर्धनासाठी महागडी रासायनिक औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे.
.........
रब्बी हंगामात हवामान बदलाचा प्रभाव आणि परिणाम जाणवत आहे. पुढील आठ दिवस थंडीतही चढ-उतार होणार आहे. गहू आणि कांदा पिकाला पाणी, खते आणि औषधांचे योग्य नियोजन केल्यास पीक यशस्वीपणे काढता येईल. तुरा आलेले ऊस पीक गाळपाला येणे योग्य राहील. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ.
.........
ढगाळ वातावरण पिकांच्या वाढीसाठी निश्चितच धोकादायक ठरत आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आल्याने पिकांवर रोगराई पसरू लागली आहे. आगाप कांद्याच्या उत्पादनात किमान ५० टक्के घट झाली आहे.- विलास मोहिते, शेतकरी मोहितेवाडी.
.......
खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मुबलक पाणी ही शेतकºयांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे. चालू वर्षी सुरुवातीच्या आगाप कांद्याला चांगला बाजारभाव प्राप्त झाल्याने अनेक शेतकरी मागास कांद्याकडे आकर्षित झाले आहेत. सध्या प्रतीनुसार कांद्याला प्रतिकिलो ३५ ते ४० रु. भाव मिळत आहे. हवामानाची साथ मिळत नसल्याने मागास कांदालागवडी धोक्यात येऊ लागल्या आहेत.
दूषित हवामानामुळे मका, मागास गहू, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके, कोबी, फ्लॉवर आदी महत्त्वाच्या सर्वच पिकांवर करपा, मावा, पीळ, चिकटा, अळी आदी रोगांचा अधिक प्रादुर्भाव होऊ लागला आहे. या सोबतच जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागाही ढगाळ वातावरणमुळे संकटात आल्या आहेत. पुढील काही दिवस वातावरण असेच राहिल्यास ही पिके पूर्णत्वास येण्यास अडचण येणार असल्याचे उत्पादक शेतकºयांनी सांगितले.