उजनीकाठी ‘पक्षीपे्रमीं’ची वाळूव्यावसायिकांनी केली अडचण
By admin | Published: January 11, 2016 01:37 AM2016-01-11T01:37:59+5:302016-01-11T01:37:59+5:30
उजनी जलाशयामध्ये कुंभारगाव, डिकसळ या परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाल्याने हे पक्षी पाहण्यासाठी दूरदूरचे पर्यटक
पळसदेव : उजनी जलाशयामध्ये कुंभारगाव, डिकसळ या
परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाल्याने हे पक्षी पाहण्यासाठी दूरदूरचे पर्यटक, पक्षीप्रेमी गर्दी करीत आहेत. रविवारी (दि. १०) राज्यभरातून पर्यटकांनी सुटीमुळे पक्षिदर्शनाचा आनंद लुटला. त्यामुळे ‘उजनीकाठी - पर्यटकांची मांदियाळी’ असे चित्र सध्या दिसत आहे. परंतु, वाळूमाफियांनी वाळूसाठी खोदलेले खड्डे, वाळू वाहतूक करणाऱ्या
ट्रकमुळे खराब झालेला रस्ता यामुळे पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या उजनी जलाशयाच्या कुंभारगाव, डाळज, डिकसळ या भागात प्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांसह अनेक विविध जातींच्या पक्ष्यांनी गर्दी केली आहे. त्यामुळे हे पक्षी उजनीच्या गतवैभवात भर पाडत आहेत. त्यातच पक्षी पाहण्यासाठी येणारे पर्यटक, पक्षिमित्र, पक्षिप्रेमी यांना कुंभारगाव येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत राहण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटक पक्षी पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.
रविवारी तर उजनीलगत अनेक पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे उजनीचा परिसर गजबजून गेला. ठाणे, मुंबई, पुणे या ठिकाणाहून पर्यटक पक्षी पाहण्यासाठी येत होते.
अनेक पर्यटकांना तर फ्लेमिंगो पक्ष्यांची छबी गुलाबी रंग, उंच मान, लांब पाय, लांब चोच, असे वर्णन असलेले फ्लेमिंगो (रोहित) पक्षी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सैबेरिया या देशातून त्यांचे होत असलेले आगमन व दूरचा प्रवास हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
मात्र, उजनीच्या पात्रात बेकायदा वाळूउपसा सुरू असल्याने जुने भिगवण ते जुने डाळज या रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. जुने डाळज येथील पुलाच्या ठिकाणी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्ता खचल्याने पर्यटकांना आपल्या गाड्या लांब लावाव्या लागत आहेत. त्यातच रस्त्यालगत वाळूउपसासाठी खोदलेले मोठे खड्डे यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)