नवी रुग्णवाहिका ठरतेय रुग्णांना अडचणीची
By admin | Published: May 30, 2017 02:02 AM2017-05-30T02:02:48+5:302017-05-30T02:02:48+5:30
निमगाव केतकी आणि परिसरातील लहान गावे आणि लहान वाड्या-वस्त्यांसाठी जीवनदायिनी ठरलेली आरोग्य विभागाची या आरोग्य
लोकमत न्यूज नेटवर्क
निमगाव केतकी : निमगाव केतकी आणि परिसरातील लहान गावे आणि लहान वाड्या-वस्त्यांसाठी जीवनदायिनी ठरलेली आरोग्य विभागाची या आरोग्य केंद्रासाठी असलेली जुनी फोर्स कंपनीची अँब्युलन्स (१०८) ही आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच बदलण्यात आली. त्याऐवजी अशोक लेलँड कंपनीची लहान गाडी देण्यात आली आहे. मात्र, ही गाडी रुग्णांना तातडीने आणण्यासाठी वाड्या-वस्त्यावरील कच्च्या रस्त्यांवरून अडचणीची ठरत असल्याचे चित्र असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
रुग्णांचा कॉल आल्यानंतर वाड्या-वस्त्यांवरील कच्च्या रस्त्याने, पाणंदीच्या रस्त्याने नेण्यासदेखील अडचण येत असल्याचे रुग्णांना रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागते, अशी तक्रार नागरिकांची आहे. या गाडीची जमिनीपासूनची उंची कमी असल्याने ग्रामीण भागात रुग्णवाहिकेला समस्या निर्माण होत आहेत, अशी माहिती अॅड. सचिन राऊत यांनी दिली.
सुरुवातीची रुग्णवाहिका (१०८ नंबर गाडी) ची इंजिन क्षमता जास्त होती. कोणत्याही रस्त्यावरून धावण्यास अडचण येत होती. जमिनीपासून उंच असल्यामुळे रुग्णांना वेळेत सेवा मिळत. त्यामुळे जुनीच गाडी पुन्हा मिळावी, या मागणीसाठी अॅड. सचिन राऊत, तात्यासाहेब वडापुरे, माणिक भोंग हे गेल्या आठ दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. याबाबत आरोग्य संचालकांनादेखील कळविण्यात आले आहे. त्यांनी गाडी बदलून देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. आरोग्य विभागाने याबाबतीत दिरंगाई केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी माहिती सचिन राऊत यांनी दिली.