सहकारनगर येथील मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण ; काँग्रेस नेत्यांशी पोलिसांची हुज्जत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 12:18 PM2019-04-23T12:18:37+5:302019-04-23T12:21:13+5:30
नेत्यांचे एकमेकांशी बोलणे सुरू असताना एका कार्यकर्त्याने मोबाईलमध्ये फोटो काढला. त्यावरून एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना टोकले.
पुणे : काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे, पुण्याचे उमेदवार मोहन जोशी आणि ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांनी वाद घातल्यामुळे सहकारनगर येथील मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिंदे हायस्कुल येथील मतदान केंद्रावर जोशी आणि रणपिसे मतदार केंद्रांची पाहणी करत फिरत असताना आले होते. तेथे ज्येष्ठ नेते उल्हास पवार रांगेत उभे होते. या तिघांचे बोलणे सुरू असताना एका कार्यकर्त्याने मोबाईलमध्ये फोटो काढला. त्यावरून एका महिला पोलीस उपनिरीक्षकांने त्यांना टोकले. कार्यकर्त्यांचा फोन जप्त करण्यात आला. त्यामुळे रणपिसे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिका पोलीस उपनिरीक्षक यांच्याशी त्यांचा वाद झाला. संबंधीत उपनिरीक्षकाने रणपिसे यांना असले एमएलए फिमेले मी ओळखत नाही असे म्हटल्याने वातावरण गंभीर झाले होते.
आमदार रणपिसे यांनी यावरून हक्कभंग होऊ शकतो असे सांगत पोलिसांची दडपशाही चुकीची असल्याचे म्हटले. दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे यांनी घटनास्थळी धाव घेत सामोपचारने दोघांची समजूत काढली. मात्र, या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांचा जप्त करण्यात आलेला मोबाईल फोटो डिलीट करून परत करण्यात आला.