खासदारांसमोर मांडल्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:36 PM2018-08-31T23:36:00+5:302018-08-31T23:36:58+5:30
जागर जाणिवांचा उपक्रम : युवतींना समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याचे केले आवाहन
भूगाव : महाविद्यालयाची वेळ केवळ आठ ते साडेबारा असताना आम्ही घरातून सकाळी सहा वाजता निघुन सायंकाळी सहा वाजता घरी पोहोचतो. हे फक्त एसटीच्या अनियमित वेळेमुळेच, अशा शब्दांत पिरंगुटच्या विद्यार्थिनींनी समस्यांचा पाढा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर वाचला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई द्वारा आयोजित युवा संवाद यात्रा जागर हा जाणिवांचा या उपक्रमात पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात खासदार सुळे यांनी विद्यार्थ्यीनींशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनीही त्यांच्याशी मनमोकळेपणा समस्यांविषयी चर्चा केली. एसटीच्या अनियमितपणामुळे अभ्यासालाही वेळ मिळत नाही, डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी करावी लागणारी पायपीट, पिरंगुटपासून महाविद्यालयापर्यंत दोन किमी चिखल तुडवत येताना येणाऱ्या अडचणी, मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांचा नकारात्मक दृष्टिकोन आदी समस्यांचा उहापोह करण्यात आला. विद्यार्र्थिनींना संबोधन करताना खासदार सुळे यांनी युवतींनो निर्भीड बना, प्रचंड मेहनत करून आपले भविष्य उज्वल करा, तासन्तास अभ्यास तर कराच शिवाय आपल्या प्रकृतीकडे लक्ष्य द्या, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, जीवनातील संकटांचा सामना धीरोदात्त पणे करा, कठिण प्रसंगी आई वडील शिक्षक, प्राचार्यांची मदत घ्या असे आवाहन केले. तसेच संबंधित घटकाला योग्य कारवाई करण्याच्या सुचना देखील केल्या.
शैक्षणिक आणि वैयक्तिक अडचणी बरोबरच समाजातील वाढते स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण, हुंडाबळी, तरुणांमधील व्यसनाधीनता, मराठा आरक्षण, इत्यादी ज्वलंत समस्येवर देखील खासदार सुळे यांनी आपले विचार मांडले. महाविद्यालयातील तरुणांना नवसमाजनिर्मितीसाठी चांगल्या आचारांना, विचारांना महत्व द्या. महिला, मुलींचा सन्मान करा, परिसर स्वच्छतेसाठी प्रयत्नरत रहा या शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. संदीप कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, सुनील चांदेरे, शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, सभापती कोमल साखरे, युवक अध्यक्ष अमित कंधारे, जितेंद्र इंगवले, सविता पवळे, सविता दगडे, कोमल वाशिवले, महादेव कोंढरे आदी उपस्थित होते.
मुळशीत बराच भाग हा दुर्गम आहे. तेथील लोकांचे शेती हेच प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. तरीही या परिस्थितीतून विद्यार्थी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी दररोज एसटीने ५० ते ६० किमी प्रवास करुन येतात. रस्त्यांची प्रचंड प्रमाणात झालेल्या दुरावस्थेमुळे एसटीही उशिरा अथवा कधीकधी येतच नाही. विद्यार्थ्यांना यावेळी खासगी अथवा कोणाकडेतरी लिफ्ट मागुनच घरी व महाविद्यालयात जावे लागते. कधीकधी उशीर झाल्यामुळे महाविद्यालयाचे एक-दोन तास बुडतात. अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या.