अठरा गाव मावळातील लोकांनी मांडला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:34+5:302021-02-16T04:11:34+5:30
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील अठरा गाव परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत आपल्या व्यथा मांडल्या. सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ...
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील अठरा गाव परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत आपल्या व्यथा मांडल्या. सर्व समस्यांचे निराकरण करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. वेल्हे तालुक्यातील पासली येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनी
येथील ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेत शंकाचे निरसन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, पंचायत समिती सभापती दिनकर सरपाले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकर भुरुक, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने नंदू रसाळ, सुधीर रेणुसे, रोहिदास शेंडकर, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, महावितरणचे कार्यकारी उपअभियंता शैलेश गिते, वेल्हे शाखा अभियंता संतोष शिंदे, शिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अठरा गाव परिसरात कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे आहेत. परंतु या एकाही बंधाऱ्यात पाणी साठत नाही, कारण हे सर्व बंधाऱ्याची दुरुस्ती झालेली नाही. सर्व ठिकाणी गळती असल्याने पाणी साठत नसल्याची तक्रार विलास शिळीमकर यांनी केली. तर निगडे, कुंबळे, केळद, पासली येथील गावठाणातील महावितरणचे सडलेले खांब त्वरित बदलावे तर पासली येथे स्वंतत्र रोहित्र बसवावे,
अशी मागणी केळदचे सरपंच रमेश शिंदे यांनी केली. तसेच वेल्हे ते पासली रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करुन मिळावा, असे बापू कुमकर यांनी सांगितले. तर शाळा दुरुस्ती, तसेच शाळांना नवीन इमारती, नवीन वर्गखोल्या लागणार असल्याचे शिवाजी पोटे यांनी सांगितले. निगडे, कुंबळे, वरोती, हारपुड आदी गावांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असून या ठिकाणी विहिरी तसेच पाईप लाईन टाकण्याची अत्यंत गरज असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
अठरा गाव मावळ परिसरात कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे असुन देखील निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने एकाही बंधाऱ्यात पाणी साठत नाही. हे बंधारे ताबडतोब दुरुस्त करावेत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले तर आभार विलास शिळीमकर यांनी मानले.
चौकट
मंजुर झालेली व सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता नागरिकांनी, सरपंचांनी तपासून घ्यावी तसेच कामे दर्जेदार झाली पाहिजेत, यासाठी सतर्क रहावे. शाळा दुरुस्ती,तसेच नवीन वर्गखोली, अंगणवाडी इमारतीसाठी प्रस्ताव ताबडतोब द्या. अठरा गाव मावळ परिसरातील गळती असलेल्या बंधाऱ्यांची ताबडतोब दुरुस्ती करुन घेण्याच्या सूचना छोटे पाटबंधारे विभागाला दिल्या. पाणीपुरवठा योजनेतील कामे त्वरित सुरु करा व टंचाईग्रस्त गावात जाऊन पाण्यासाठी अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतीपंपासाठी वीज कनेक्शन ताबडतोब शेतकऱ्यांना देण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
-रणजित शिवतरे, उपाध्यक्ष
फोटो - पासली (ता. वेल्हे) येथे आढावा बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे.