स्थानिकांच्या विरोधामुळे बहुचर्चित नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्दची प्रक्रिया अंतिम टप्प्यात : सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 07:47 PM2018-06-13T19:47:19+5:302018-06-13T19:47:19+5:30
राज्य शासनाबरोबर करार केलेल्या २ हजार ४०० कंपन्यांपैकी २ हजार १२१ कंपन्यांनी उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात वाढ : सुभाष देसाई
पुणे: कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्यामुळे या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी दिली.
राज्यात उद्योगांना चांगले वातावरण असून मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत विविध औद्योगिक कंपन्यांबरोबर १२ लाख कोटी रुपयांचे करार झाले आहेत.राज्य शासनाबरोबर करार केलेल्या २ हजार ४०० कंपन्यांपैकी २ हजार १२१ कंपन्यांनी उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात वाढ होत आहे, सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाच्या वतीने पुण्यात आयोजित केल्या जाणा-या रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.
देसाई म्हणाले,उद्योगांसाठी लागणा-या जमीन,पाणी,वीज आदी पायाभूत सुविधेसह राज्यात कुशल मन्युष्यबळ उपलब्ध आहे.त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात येणा-या उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यातच काही कंपन्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड घेवून ठेवले होते. मात्र, त्यावर कोणताही औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे वर्षानुवर्षे पडून असलेले राज्यातील सुमारे २ हजार भूखंड शासनाने पुन्हा ताब्यात घेतले असून त्याची फेर वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. तळेगाव एमआयडीसीमधील जमीन सुध्दा विविध कंपन्यांना दिली जात आहे.
राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग,उद्योग संचलनालय आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १६ जून रोजी पुण्यात उरूळी देवाची येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होणार असून त्यासाठी ८ हजार ८०० बेरोजगारांनी नोंदणी केली आहे. त्यातील ४ हजार ८०० बेरोजगार तांत्रिक क्षेत्रातील आहेत.परिसरातील ९२ नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी बेरोजगार तरुण-तरुणींच्या मुलाखती घेणार आहेत. या मेळाव्यास पालकमंत्री गिरीश बापट व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत, असेही देसाई यांनी सांगितले. तसेच पुण्यानंतर नाशिक व नवी मुंबईसह राज्यभरात रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत,असेही देसाई म्हणाले.
दरम्यान, भोसरी येथील एकनाथ खडसे यांच्याविषयी विचारले असता हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करता येणार नसल्याने देसाई यांनी सांगितले.