पावसाच्या पाण्यावर प्रक्रिया
By admin | Published: January 6, 2016 12:51 AM2016-01-06T00:51:59+5:302016-01-06T00:51:59+5:30
शहरातील रस्त्यांवरून वाहत जाणारे पावसाचे पाणी अडवून त्यावर प्रक्रिया करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेच्या वतीने राबवण्यात येणार आहे.
पुणे : शहरातील रस्त्यांवरून वाहत जाणारे पावसाचे पाणी अडवून त्यावर प्रक्रिया करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेच्या वतीने राबवण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात स्थायी समितीच्या सभेत आज (मंगळवार) मंजुरी देण्यात आली.
पावसाचे पाणी साठवण्यासाठीचे प्रकल्प करणाऱ्या इमारतींना पालिकेच्या वतीने मिळकतकरात सवलत दिली जाते. मात्र, रस्त्यावरून वाहणारे पाणी वायाच जाते. ते साठवून त्यावर प्रक्रिया करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम पालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंटस या संस्थेला दिले होते. नुकताच त्यांनी हा आराखडा पालिकेला सादर केला.
या आराखड्यानुसार शहराचे क्षेत्र वेगवेगळ्या २३ पाणलोटांमध्ये विभागलेले आहे़ पाण्याचा निचरा करण्याचे काम तीन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बाणेर, वडगावशेरी, खराडी व वडगाव बुद्रुक या परिसरात काम होईल. दुसऱ्या टप्प्यात वारजे, बावधन, पाषाण, हडपसर, तिसऱ्या टप्प्यात मंगळवार पेठ, शनिवार पेठ, शहराचा उर्वरित भाग व धायरी क्षेत्र समाविष्ट आहे़
शहराच्या उपनगर परिसरात सध्या नाल्यांवर बांधकामे करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यात वाढ होऊ नये यासाठी प्राधान्याने त्या परिसरातील कामे सुरू करण्यात येतील.
पावसाच्या या साठवलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मोठा प्रकल्प सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे. या कामाचा एकूण आवाका लक्षात घेऊन त्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. या पाणलोट क्षेत्रात वेगाने विकासकामे चालू असून या भागातील नाल्यावर अतिक्रमणे होण्याची शक्यता लक्षात घेऊन कामे वेगाने सुरू करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)